Coronavirus : सिने, मालिका निर्मात्यांनी गोव्यातून गाशा गुंडाळला, सिल्व्हासा, दमणकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 09:01 PM2021-05-07T21:01:07+5:302021-05-07T21:05:28+5:30
Coronavirus : गेले काही दिवस गोव्यात मुंबई, पुणे येथील अनेक सिने निर्माते तसेच वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांचे निर्माते चित्रीकरण करीत होते. लोकांनी त्यास आक्षेप घेतला होता.
पणजी - कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर गोवा मनोरंजन संस्थेने सर्व परवाने रद्द करीत मालिका तसेच सिनेमांच्या चित्रीकरणाला चाप लावल्याने गोव्यात शूटिंगसाठी आलेल्या निर्मात्यांनी दादरा - नगर हवेली, दमण व दीवमधील सिल्वासा तसेच अन्य भागांकडे मोर्चा वळविला आहे. गेले काही दिवस गोव्यात मुंबई, पुणे येथील अनेक सिने निर्माते तसेच वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांचे निर्माते चित्रीकरण करीत होते. लोकांनी त्यास आक्षेप घेतला होता.
दोन दिवसांपूर्वी मडगाव येथील रवींद्र भवनात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी अशाच एका चित्रीकरणाला आक्षेप घेत सरकारने चित्रीकरण चालू ठेवले तर ते बंद पाडू, असा इशारा दिला होता. त्यानंतर मनोरंजन संस्थेने सर्व परवाने रद्द करीत गोव्यातील चित्रीकरणे बंद केली.
गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई म्हणाले, राज्यात कोविडचे संकट जोपर्यंत निवळत नाही. तोपर्यंत गोव्यात चित्रीकरणावरील बंदी कायम राहील. ते म्हणाले की, राज्यात किमान ३० ठिकाणी सध्या चित्रीकरणासाठी आम्ही परवानगी दिली होती. केवळ इनडोअर शूटिंगला परवानगी होती. अनेक निर्माते बंदिस्त बंगल्यांमध्ये किंवा बंदिस्त व्हिल्लांमध्ये चित्रीकरण करीत होते. परंतु तेही चालू ठेवण्यास आता परवानगी नाही कारण कोविडचा फैलाव झपाट्याने वाढलेला आहे. आणि गोमंतकीयांच्या आरोग्याच्यादृष्टीने कोणताही धोका पत्करण्यास सरकार तयार नाही. जिल्हाधिकारी तसेच पोलिस यंत्रणा यांना जो कोणी या आदेशाचा भंग करील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे ते म्हणाले.
फळदेसाई म्हणाले की, उल्लंघनाच्या प्रकरणात थेट कारवाईचा अधिकार संस्थेला नाही. हे अधिकार कायदा दुरुस्ती करून घ्यावे लागतील. तसा प्रस्ताव आम्ही सरकारकडे मांडलेला आहे. दरम्यान, एका मराठी मालिकेच्या निर्मात्याने असे सांगितले की दमणमध्ये त्या सरकारने काय भूमिका घेतली आहे याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. तेथे परवानगी मिळाल्यास आम्ही 'लोकेशन' बदलणार आहोत.
दरम्यान, देशात इतरत्र महामारीमुळे चित्रीकरणाच्या बाबतीत सामसूम असताना गोव्यात मात्र मराठी आणि हिंदी मालिकांचे चित्रीकरण धडाक्यात सुरू होते. स्टार प्लस हिंदी चॅनलवरील ' ये है चाहतें', 'शौर्य और अनोखी की कहानी', 'आप की नजरोंनें समझा' तसेच 'गुम है किसी के प्यार में' तर मराठी स्टार प्रवाह चॅनलवरील 'सुख म्हणजे नक्की काय असते', ' रंग माझा वेगळा,' झी मराठीवरील 'अगंबाई, सुनबाई', तसेच कलर्स मराठीवरील 'ऑनलाइन शुभमंगल', सोनी कलर्स मराठीवरील 'आई माझी काळुबाई', या मालिकांचे चित्रीकरण गोव्याच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात चालू होते. अनेक ठिकाणी हॉटेले किंवा व्हिल्ला भाड्याने घेऊन शूटिंग केले जात होते.