CoronaVirus News: भाजपा सरकारकडून 'त्या' १८ जणांची हत्या केली; काँग्रेसचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 08:11 PM2020-07-15T20:11:25+5:302020-07-15T20:11:45+5:30
कृती आराखडा जाहीर करा, अन्यथा आत्मक्लेश आंदोलन; काँग्रेसचा इशारा
मडगाव - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन अविचारी व कोणताही ठोस शास्त्रीय आधार नसलेला आहे व तो निर्णय डिफेक्टिव्ह भाजप सरकारचे प्रतिबिंब आहे. गोव्यातील असंवेदनशील व भ्रष्ट भाजप सरकारने निष्पाप १८ कोविड रुग्णांची एकाप्रकारे हत्याच केली आहे. आज सरकारच्या बेपर्वाईमुळे जनता भयभीत झाली आहे असा आरोप काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी ताबडतोब कोविड हाताळणीचा कृती आराखडा तसेच श्वेतपत्रिका जारी करावी. सरकारने त्वरित याची दखल न घेतल्यास काँग्रेस पक्ष आत्मक्लेशाचे आंदोलन करेल.
सरकारने कृती आराखडा व श्वेतपत्रातुन सर्व माहिती जनतेसमोर ठेवल्यानंतर त्याचा अभ्यास करुन आम्ही सरकारला योग्य सल्ला देऊ शकतो.
काँग्रेसने पहिल्या दिवसापासून सरकारला कोविडचा सामना करण्यासाठी योग्य सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. आमचे विधिमंडळ गट नेते तसेच चार आमदार यांनी अनेक विधायक सूचना सरकारला केल्या. सामाजिक क्षेत्रातील तज्ञ व लष्करांचे काही सदस्य यांचा टास्क फोर्स करणे, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी सर्व भुसारी दुकाने लॉकडाऊन काळात उघडी ठेवणे, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पुर्णपणे कार्यांवित करुन तेथे कोविड सेंटर स्थापन करणे यासह लॉकडाऊनमुळे हलाखीच्या परिस्थितीत असलेले छोटे व्यावसायिकांना १०० कोटींची आर्थिक पॅकेज देणे अशा अनेक सूचना आम्ही सरकारला केल्या.
मुख्यमंत्र्यानी हट्टाला पेटून केलेल्या सामाजिक सर्वेक्षणाला काँग्रेसने आक्षेप घेतला होता व त्याऐवजी सामाजिक चाचणी करण्याची मागणी केली होती. मांगोरचे कोविड रुग्ण वाढू लागल्यानंतर वास्को शहर लॉकडाऊन करण्याच्या आमची मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले. काँग्रेसचे आमचे दिवंगत नेते जितेंद्र देशप्रभू यांच्या निधनानंतर लगेच गोमेकोतील चाचणी व्यवस्था व आकडेवारी यांवर प्रश्न विचारले होते. परंतु, सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले व त्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
लोक संकटात असताना गोव्यातील भाजप सरकार मोदींची वर्षपूर्ती व आभासी सभा घेण्यात व्यस्त होते. त्यामुळे कोविडचा संसर्ग आज संपूर्ण गोव्यात झाला आहे. सरकारने वेळ न घालवता सर्वांना विश्वासात घेऊन तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सर्वजण यांची बैठक घ्यावी व त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावरुन पुढची कृती ठरवावी. मागील ३ महिने काँग्रेस पक्ष मागणी करीत असलेला कृती आराखडा व श्वेतपत्रिका सरकारने ताबडतोब काढावी.