CoronaVirus: गोव्यात अडकलेल्या ब्रिटिशांना दिलासा, पुढच्या आठवड्यात मायदेशी नेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 05:28 PM2020-04-05T17:28:31+5:302020-04-05T17:30:08+5:30
ब्रिटिश उच्चायुक्त जॅन थॉंप्सन यांनी एका व्हिडीओद्वारे ही घोषणा प्रसारित केली आहे, मात्र एकाच बरोबर सगळ्यांनाच घेऊन जाणे शक्य होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
मडगाव: अजूनही गोव्यात अडकलेल्या हजारो ब्रिटिश पर्यटकांना दिलासा देणारी घोषणा ब्रिटिश सरकारने केली आहे. भारतात अडकलेल्या ब्रिटिशांना मायदेशी घेऊन जाण्यासाठी पुढच्या आठवड्यापासून खास चार्टर विमाने पाठविण्यात येणार आहेत. ब्रिटिश उच्चायुक्त जॅन थॉंप्सन यांनी एका व्हिडीओद्वारे ही घोषणा प्रसारित केली आहे, मात्र एकाच बरोबर सगळ्यांनाच घेऊन जाणे शक्य होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
सध्या उत्तर आणि दक्षिण या गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात सुमारे 1000 ब्रिटिश अडकून पडले आहेत. त्यातील काही जण भाड्याने घेतलेल्या खासगी घरात राहत असून, अशा लोकांचे विशेष हाल होत आहेत. जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी त्यांची मारामार होते. गोव्यासह भारतात अडकलेल्या ब्रिटिश नागरिकांना घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यासाठी ब्रिटिश विदेश सचिव डोमनिक रब आणि दळणवळण सचिव ग्रेटस शाप्स हे दोघेही भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संपर्कात आहेत.
या अडचणीच्या प्रसंगी काही युरोपियन समूह राष्ट्रेही ब्रिटनच्या मदतीला धावून आली असून, फ्रँकफर्ट, झुरिक, डलंबिन, हेलसिंकी आणि रोम येथे आलेली विमाने ब्रिटनपर्यंत नेण्याची परवानगी दिली आहे. 3 एप्रिल रोजी गोव्यातून रोमला रवाना झालेल्या विमानात काही ब्रिटिश प्रवाशांनाही जागा ठेवण्यात आली होती, शनिवारी बल्गेरिया येथे गेलेले विमानही 100 ब्रिटीश प्रवाशांना आपल्याबरोबर घेऊन गेले होते.