coronavirus : गोव्यात कोरोनाच्या चाचण्या तूर्त प्रायोगिक तत्वावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 02:07 PM2020-03-28T14:07:16+5:302020-03-28T14:08:29+5:30
पुण्याहून शिक्कामोर्तब झाल्यावर होणार अहवाल जाहीर
पणजी - कोरोना व्हायरस संसर्गाचा चाचण्या आता गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आल्या आहेत. तूर्त चाचण्या या प्रायोगि तत्वावरच होणार असून पुणे व्हायरोलोजी लँबच्या शिक्कामोर्तब झाल्यावरच अहवाल जाहीर केले जाणार आहेत.
पीसीआर मशीन गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध करून घेण्यास सरकारला यश मिळाल्यानंतर आणि चाचणी विषयक प्रशिक्षण घेऊन गोमेकॉचे पथक पुण्याहून गोव्यात परतल्यानंतर प्रत्यक्ष चाचण्या सुरूही झाल्या आहेत. अशा प्रकारच्या या चाचण्या गोव्यात नवीनच होत असलयामुळे आणि चाचणी करणारे प्रशिक्षित डॉक्टर व तांत्रिक कर्मचारी नवीनच असल्यामुळे येथील चाचणी अहवालाची पडताळणी करण्चाची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही पुणे येथील व्हायरोलोजी लँबमध्ये संशयितांच्या लाळेचे नमुने पाठविले जात आहेत. पुण्यातील आणि गोमेकॉतील अहवाल एकच निष्कर्श काढतात की नाही हे पाहाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे काही दिवस गोमेकॉतील चाचण्या या प्रायोगिक तत्वावरच होणार आहेत अशी माहिती गोमेकॉतील एका अधिकाऱ्याडून देण्यात आली.
पीसीआर मशीन गोमेकॉत आणल्यानंतर गोमेकॉतील दोन डॉक्टरसह एक तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पुणे येथील व्हायरोलोजी लँबमध्ये पाठविण्यात आले होते. मायक्रो बायलोजी विभागाचे प्रमुख डॉ सावियो रॉड्रिगीश, डॉ उल्हास गावस, आणि तात्रिक विभागाच्या ग्रीष्मा पार्सेकर या तिघांचे पथक पुण्याहून प्रशिक्षण घेऊन गोव्यात परतले होते. त्यानंतर लवकरच गोमेकॉच्या मायक्रोबायलोजी विभागाकडून चाचण्या स सुरूही करण्यात आल्या आहेत.
प्रायोगिक तत्वावरील प्रयोग यशस्वी सिद्ध झाल्यास प्रायोगिक तत्वावरील चाचण्या थांबविल्या जातील आणि नियमीत चाचण्या सुरू केल्या जातील. संशयित रुग्णाच्या लाळेचे नमुने पुण्याला पाठवावे लागणार नाहीत. गोमेकॉतीलच चाचणी अहवाल ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे चाचणीचे अहवाल लवकर मिळणार आहेत.