Coronavirus : गोव्यात कोरोनाने घेतले तब्बल ७१ बळी, विषाणूच्या भयानक फैलावामुळे राज्य सुन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 07:22 PM2021-05-05T19:22:07+5:302021-05-05T19:23:03+5:30
Coronavirus In Goa : कुणाच्याही जीवाचा थरकाप उडावा अशी स्थिती गोव्यात आहे. लोक घराबाहेर पडण्यास आता घाबरतात. सरकारी कार्यालये ओस पडली आहेत.
पणजी : राज्यात आणखी ७१ कोविड रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे एका गोमेको इस्पितळात ४५ रुग्णांचा जीव गेला. ७१ पैकी ७० रुग्णांचा मृत्यू हा गेल्या चोवीस तासांत झाला. नवे ३ हजार ४९६ कोविड रुग्ण राज्यात आढळले आहेत. पूर्ण राज्य यामुळे सून्न झाले आहे. बुधवारी दर एका तासाला तिघांचे मृत्यू झाले असा अर्थ होत आहे.
कुणाच्याही जीवाचा थरकाप उडावा अशी स्थिती राज्यात आहे. लोक घराबाहेर पडण्यास आता घाबरतात. सरकारी कार्यालये ओस पडली आहेत. दक्षिण गोव्याच्या जिल्हा इस्पितळात बुधवारी वीस कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. कुडचडे येथील सरकारी रुग्णालयात एकाचा जीव गेला तर दोघांचा मृत्यू उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात झाला. होस्पीसियोमध्ये एकाने अखेरचा श्वास घेतला. ७१ पैकी एक मृत्यू गोमेकोमध्ये २८ रोजी झाला, त्याची नोंद बुधवारी झाली.
कमी वयाच्या रुग्णांचा बळी
ज्यांनी वयाची चाळीशी गाठली नाही, अशा रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. ज्यांनी पन्नाशी गाठली नाही असे रुग्णही दगावत आहेत. कळंगुट येथील २८ वर्षीय महिलेचे कोविडने निधन झाले. शिवोली येथील ४५ वर्षीय महिला, डिचोलीतील ३९ वर्षीय पुरुष रुग्ण, मडगाव येथील ३५ वर्षीय तरुण यांचे कोविडने निधन झाले. तिसवाडी, सत्तरी, बेती, पेडणे, वास्को, पर्वरी, कुडचडे, खोर्ली, दाबोळी, फातोर्डा, शिरोडा, ताळगाव, केळशी, बायणा , धर्मापुर, सावर्डे अशा गावांतील अनेक कोविडग्रस्तांचा बळी गेला आहे. फातोर्डा येथील दोघांचा मृत्यू झाला.
५१.६ टक्के टीपीआर
चाचण्यांमागे पोझिटीवीटीचे प्रमाण बुधवारी वाढले. ३९ टक्क्यांवरून हे प्रमाण ५१.६ टक्के झाले आहे. एकूण ६ हजार ७६९ चाचण्या केल्या गेल्या व त्यावेळी ३,४९६ नवे रुग्ण आढळले. राज्यभर आता २७ हजार ९६४ सक्रिय कोविड रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण १,४४३ रुग्णांचे मृत्यू झाले.