CoronaVirus News: गोव्यातील कोविड मृत्यूंचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा तिप्पट जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 09:04 PM2020-09-14T21:04:38+5:302020-09-14T21:04:54+5:30
गोवा फॉरवर्डचा आरोप; आता तरी लोकांचा जीव वाकविण्यावर लक्ष केंद्रित करा
मडगाव: गोव्यात कोविडच्या मृत्यूची संख्या 303 वर पोहोचली आहे. दर 10 लाख माणसांमागे हे प्रमाण 150 पेक्षा अधिक आहे. कोविड मृत्यूची राष्ट्रीय सरासरी दर 10 लाख लोकांमागे 58 एव्हढी आहे. गोव्यातील मृत्यूंचे प्रमाण तिप्पट अधिक असून आता गोवा सरकारने या गोष्टीकडे गंभीरपणे पाहण्याची गरज गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.
सरदेसाई म्हणाले, कोविड व्यवस्थापनाचे यश किती लोकांमध्ये कोविडचा प्रधुर्भाव झाला यात नसून किती लोकांचे प्राण वाचले यात आहे . जागतिक स्तरावरही ही सरासरी दार दशलक्ष लोकसंख्येमागे 120 एव्हढी आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सरदेसाई म्हणाले, ही आकडेवारी पाहिल्यास गोव्यातील कोविड व्यवस्थापन बिघडले आहे. आता तरी निवडणुका आणि अन्य राजकीय अजेंड्यावर काम न करता गोवा सरकारने लोकांचे जीव कसे वाचतील यावर लक्ष केंद्रित करावे असे ते म्हणाले.
यासाठी जास्तीत जास्त लोकांची चाचणी करून त्यांचे अहवाल लवकर मिळतील अशी योजना तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अचूक निधान करण्यासाठी दक्षिण गोव्यातही आणखी एक अबोट चाचणी मशीन आणण्याची गरज आहे. जास्तीत जास्त खासगी इस्पिटलांना कोविड व्यवस्थापनात सामावून घेण्याची गरज असून रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होईल याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. वास्तविक हे सारे उपाय लॉकडाऊनच्या काळात घेण्याची गरज होती. त्यावेळी सरकार सुस्त राहिले निदान आतातरी जागे व्हावे अशी मागणी त्यांनी केली.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पिटलाचे वरचे दोन मजले कोविड निगा केंद्र म्हणून वापरण्यात यावेत आणि रवींद्र भवनही कोविड निगा केंद्रात रूपांतरीत करावे अशी त्यानी मागणी केली.