coronavirus : गोव्याच्या इस्पितळात महिलेचा मृत्यू, सरकारला अहवालाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 02:53 PM2020-03-29T14:53:40+5:302020-03-29T14:54:31+5:30
68 वर्षीय महिलेला श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. तिला सीओपिडी संसर्ग असल्याचे नंतर गोमेकाॅत आढळून आले.
पणजी - बांबोळीच्या गोमेकाॅ इस्पितळात उपचार घेणार्या 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेने गोव्याबाहेर प्रवास केला नव्हता. तिच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची सरकारला प्रतिक्षा आहे. पुणेच्या प्रयोगशाळेतून अहवाल येईल. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी रविवारी ट्विट करून देखील थोडी माहिती दिली आहे.
68 वर्षीय महिलेला श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. तिला सीओपिडी संसर्ग असल्याचे नंतर गोमेकाॅत आढळून आले. तिला गोमेकाॅच्या आयसोलेशन विभागात ठेवले गेले होते. तिला कोरोनाची लागण झाली की नाही याची वैद्यकीय चाचणी केली गेली. अहवाल प्रयोगशाळेतून अजून आलेला नाही. तो आल्यानंतरच पुढील स्थिती स्पष्ट होईल.
आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही असे आपल्याला वाटते पण प्रयोग शाळेतून अहवाल येऊ द्या. तिचा मृत्यू करोनामुळे झाला असे म्हणता येत नाही.
दरम्यान, गोव्यातील इस्पितळांमधून एकूण 56 व्यक्तींची चाचणी करुन नमुने प्रयोग शाळेत पाठवले आहेत. शुक्रवार व शनिवारी एकही अहवाल पुण्याहून गोव्यात आलेला नाही. गोवा सरकार स्वतः ची प्रयोगशाळा सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्वावर प्रयोग शाळा सुरू झाली आहे. एकदा पूर्णपणे प्रयोग शाळा सुरू झाल्यानंतर मग गोव्यातच जलदगतीने कोरोनाविषयक चाचण्या होत राहतील. दिवसाला दोनशे चाचण्याही करता येतील असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.