Coronavirus: दिल्लीचा पर्यटक गोव्यात कोविडग्रस्त आढळला; दिवसभरात १६७ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 07:44 PM2020-11-24T19:44:10+5:302020-11-24T19:57:01+5:30
मंगळवारी राज्यात एकूण २ हजार ४ व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी १६७ कोविडग्रस्त आढळले.
पणजी : दिल्लीचा पर्यटक मंगळवारी गोव्यात कोविड पोझिटिव्ह आढळला आहे. मिरामार येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये राहणारा हा ४५ वर्षीय तरुण पर्यटक कोविड पोझिटिव्ह असल्याचे चाचणीवेळी निष्पन्न झाले. लक्षणे दिसल्याने त्याने चाचणी करून घेतली. मंगळवारी दोघा स्थानिक नागरिकांचे कोविडने बळी घेतले आहेत.
मडगाव येथील एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचे बांबोळीच्या गोमेको इस्पितळात निधन झाले. तसेच आसगाव येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचाही बळी गेला. आसगावच्या इसमाला म्हापसा येथील आझिलो इस्पितळात मृतावस्थेतच आणले गेले होते. शवचिकित्सा करण्यापूर्वी चाचणीवेळी तो कोविड पोझिटिव्ह आढळून आला. त्याला कोविडची लक्षणे दिसत नव्हती, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मंगळवारी राज्यात एकूण २ हजार ४ व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी १६७ कोविडग्रस्त आढळले. राज्यातील एकूण बळींची संख्या ६७९ झाली आहे. सध्या १ हजार २२१ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासांत ८५ कोविड रुग्ण आजारातून बरे झाले.
दरम्यान, गोव्यात जे पर्यटक येतात, त्यांनी गोव्यात फिरताना मास्कचा वापर करावा. पाट्यार्ंमध्ये सहभागी होताना किंवा क्लब किंवा रेस्टोरंटमध्ये जाताना मास्क वापरावे असा सल्ला सरकारने दिला आहे. मास्क न वापरणाऱ्या पर्यटकांना दंडही ठोठावला जात आहे. होटेलांनी काही खोल्या कोविडग्रस्तांसाठी आरक्षित कराव्यात अशी सूचना नुकतीच आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी केली आहे. दिल्लीहून गोव्यात येणाऱ््या पर्यटकांसाठी गोवा सरकार यापुढे वेगळी एसओपीही आणू शकते.