Coronavirus: काहीही करा, पण आमची कशाही प्रकारे सुटका करा; समुद्रात अडकलेल्या खलाशांची विनवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 06:50 PM2020-04-15T18:50:07+5:302020-04-15T18:50:45+5:30
देवर याच्या जहाजावर 181 भारतीय खलाशी आहेत त्यातील 93 गोवेकर आहेत
सुशांत कुंकळयेकर
मडगाव: काहीही करा, पण आमची येथून कशाही प्रकारे सुटका करा. विदेशी प्रदेशात आणि तेही भर समुद्रात अडकलेल्या गोमंतकीय खलाशांची ही आर्त हाक असून त्यापुढे गोवा सरकारही हतबल झाले आहे. दुबई येथे जहाजावर अडकलेला केपेचा 24 वर्षीय खलाशी विजय देवर म्हणाला, आमच्यापैकी कित्येकजणांचा कंपनी बरोबरचा करार संपला आहे. आता त्यांना केवळ कंपनी जेवण देते, पण पगार मिळत नाही. त्यांना काही कामही नाही. अशा अवस्थेत ते कंटाळून गेले आहेत.
देवर याच्या जहाजावर 181 भारतीय खलाशी आहेत त्यातील 93 गोवेकर आहेत. या सर्वांना आपण मायदेशी परत कसे पोहोचू याचाच ध्यास लागून राहिला आहे. सध्या समाजमाध्यमावर हे खलाशी आपले व्हिडीओ टाकू लागले आहेत, जर फिलिपिन्स सारखा गरीब देश आपल्या नागरिकांना परत मायदेशी नेऊ शकतो तर भारता सारखा प्रबळ देश हा निर्णय का घेऊ शकत नाही असा त्यांचा सवाल आहे.
येथे गोव्यातही त्यांच्या कुटुंबीयांचा धीर खचू लागला आहे . करमणे येथील मारिया कार्डोझ म्हणाल्या, माझा 5 वर्षांचा मुलगा रोज विचारतो, डॅडी घरी कधी येणार? त्याला मी काय उत्तर देऊ? आपल्या पतीला परत आणावे यासाठी बुधवारी मुख्यमंत्री निवसासमोर धरणे धरलेल्या गिना परेरा म्हणाल्या, जेव्हा जेव्हा पतीचा फोन येतो त्यावेळी तो ढसा ढसा रडतो, हे आता सहनशक्तीच्या बाहेरचे झाले आहे.
आणखी एका महिलेने वाकोला मुंबई येथील मृत गोमंतकीय खलाशाचे उदाहरण देताना सांगितले, या खलाशाला चार लहान मुले आहेत. त्याची पत्नी आपल्याला मृत पतीचा चेहरा तरी पाहू द्या असा आक्रोश करते, हे सरकार आमच्यावरही हीच पाळी आणणार का? या महिलेने जो सवाल केला, तो इतरांचाही आहे.