CoronaVirus : अमेरिकेत लॉकडाऊन होण्याची भीती, गोमंतकीय खलाशी अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 10:54 PM2020-04-05T22:54:00+5:302020-04-05T22:54:35+5:30
अजूनही सुमारे 8000 गोवेकर खलाशी एकतर बोटीवर किंवा विदेशी भूमीवरील हॉटेलात अडकून पडले आहेत.
सुशांत कुंकळयेकर
मडगाव: अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे अमेरिकेतही लॉकडाऊन जाहीर करणार, अशी भीती असल्याने विदेशात अडकलेल्या गोव्यातील हजारो खलाश्यांच्या कुटुंबीयांचे धाबे दणाणले आहेत. एका मियामी शहरातच सुमारे 4000 गोमंतकीय अडकले असून, त्यांना लवकर तिथून बाहेर काढा यासाठी गोवा सरकारवर दबाव आणला जात आहे. जगातील एकूण खलाश्यांमध्ये भारतीयांची टक्केवारी 43 टक्के असून, या भारतीयांमध्ये 70 टक्के प्रमाण गोवेकारांचे आहे. अजूनही सुमारे 8000 गोवेकर खलाशी एकतर बोटीवर किंवा विदेशी भूमीवरील हॉटेलात अडकून पडले आहेत.
गोअन सीफेअरर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डिक्सन वाझ म्हणाले, एका मियामी शहरातच 5 बड्या कंपन्यांची जहाजे अडकली असून त्यात अडकलेल्या भारतीयांची संख्या 13 हजाराच्या आसपास असावी त्यातील सुमारे 4000 गोवेकर आहेत. काही कंपन्यांनी चार्टर विमानांनी या खलाश्यांच्या मायदेशी पाठविण्याची तयारी दाखविली आहे. इंडोनेशिया, फिलिपिन्स आदी देशांनी त्याला प्रतिसाद देत आपल्या नागरिकांना परत नेले पण भारत सरकारकडून अजून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. एक दोन दिवसात जर अमेरिका लॉकडाऊन झाल्यास परिस्थिती अधिक बिकट होईल.
काही क्रुझ कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा सांभाळ बऱ्या तरेने ठेवला असला तरी इटली देशातील कोस्टा कंपनीसारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिले आहे. त्यांचीच माणसे कोरोनाच्या आगीत होरपळत असल्यामुळे ते इतरांकडे कसे बघतील असे वाझ म्हणाले, या खलाश्यांना मायदेशी कसे आणता येईल याचा सर्व प्रस्ताव आम्ही सरकारला दिला आहे आता त्या त्या देशातील भारतीय दूतावसानी त्वरित हालचाल करण्याची गरज आहे. गोव्यात खलाशांच्या कुटुंबीयांचा धीर खचू लागला आहे. विदेशातील खलाशीही तणावाखाली येऊन आत्महत्या करू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात गोव्यातील अनिवासी भारतीय विभागाचे आयुक्त नरेंद्र सावईकर याना विचारले असता, आम्ही केंद्र सरकारच्या विदेश व्यवहार मंत्रालयाच्या संपर्कात आहोत. या खलाशाना लवकरात लवकर मायदेशी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले.