Coronavirus in Goa: गोव्यात आज दिवसभरात ६० कोरोनारुग्ण आढळले; अनेक गावांनी केला लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 08:55 PM2020-06-13T20:55:39+5:302020-06-13T20:55:48+5:30
राज्यातील कोरोना रुग्ण संख्येचा वाढता वेग पाहता येत्या दोन दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या पाचशेर्पयत पोहचू शकते
पणजी : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमीच होत नाही हे शनिवारी अधिक स्पष्ट झाले. ६० नव्या कोरोनाग्रस्त व्यक्ती शनिवारी आढळल्या व त्यामुळे एकूण संख्या ४५४ झाली. हळदोणा, नास्नोडा (बार्देश), मेरशी, आगरवाडा चोपडे अशा पंचायत क्षेत्रंमध्ये लोकांनी व पंचायतीनेच मिळून स्वयंस्फुर्तीने काही दिवसांचा लॉकडाऊन पुकारला आहे.
राज्यातील कोरोना रुग्ण संख्येचा वाढता वेग पाहता येत्या दोन दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या पाचशेर्पयत पोहचू शकते. यामुळे अधिकाधिक कोविड काळजी केंद्रे राज्यात सुरू करण्यासाठी सरकारी यंत्रणोची धावपळ सुरू आहे. आरोग्य सचिव निला मोहनन यांनी कुडचडे- केपे भागालाही शनिवारी भेट दिली. तिथे एक कोविड काळजी केंद्र असेल. कोलवा व पणजीतही असेल. ज्या कोरोनाग्रस्त व्यक्तींना उपचारांची गरज आहे, अशाच व्यक्तींना मडगावच्या कोविड इस्पितळात ठेवले जाते. इतर पॉझिटिव्ह व्यक्तींना कोविड काळजी केंद्रात ठेवले जाते.
मांगोरहीलशी संबंधित 26 रुग्ण
शुक्रवारी 46 कोरोनाग्रस्त व्यक्ती आढळल्या होत्या. त्यात मांगोरहीलशीसंबंधित व्यक्तींची संख्या 39 होती. शनिवारी जे 60 नवे रुग्ण आढळले, त्यात मांगोरहीलशीसंबंधित रुग्णांची संख्या 26 आहे. सत्तरी, बार्देश, तिसवाडी अशा तालुक्यांमध्ये जे कोविद रुग्ण आढळतात, त्यांचा संबंध मांगोरहीलशीसंबंध आलेल्या रुग्णांशी आला होता. ताळगावला सर्व शंभरहून जास्त व्यक्तींची चाचणी निगेटीव आली. मांगोरहीलच्या कंटेनमेन्ट झोनमध्ये सध्या निवडक व्यक्तींच्याच चाचण्या केल्या जातात. वृद्ध नागरिक, गरोदर महिला, मुलांच्या तसेच हृदयरोग व अन्य तत्सम आजार असलेल्या व्यक्तींच्या चाचण्या केल्या जातात. तरीही तिथे 26 रुगण शनिवारी आढळले.
चिंबलवर बारीक लक्ष
चिंबलला कंटेनमेन्ट झोन केला जाईल काय असे पत्रकार परिषदेत आरोग्य सचिव श्रीमती निला मोहनन यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की आम्ही चिंबलच्या स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. कोणताही भाग कंटेनमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यासाठी वैद्यकीय दृष्टीने काही निकष लावले जातात. किती रुग्ण संख्या आहे हे देखील पाहिले जाते. चिंबलला शनिवारी नवे दोन रुग्ण आढळले व त्यामुळे तेथील एकूण संख्या11 झाली. अजून तिकडे कसा ट्रेण्ड आहे हे पाहिले जात आहे. योग्यवेळी निर्णय घेतला जाईल.
पहिला रुग्ण व्हेंटिलेटर
मडगावच्या कोविड इस्पितळात एवढे रुग्ण आतार्पयत दाखल झाले तरी, एकाही रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज यापूर्वी निर्माण झाली नव्हती. तथापि, शनिवारी एकाला व्हेंटिलेटरवर ठेवावा लागला. त्याची स्थिती नाजूक आहे. त्याला अगोदरच गोमेकॉ इस्पितळात दोघांनी आणले तेव्हाच स्थिती नाजूक होती. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता व बेतीमधील दोन अज्ञात व्यक्ती त्याला घेऊन आल्या होत्या. त्या व्यक्ती आता बेपत्ता आहेत, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत असे मोहनन यांनी सांगितले. त्या रुग्णाची कोविड चाचणी केल्यानंतर ती पॉङिाटीव आली व त्यामुळे त्याला कोविड इस्पितळात नेऊन ठेवले गेले आहे.
अर्भक गोमेकॉत
मडगावच्या कोविड इस्पितळात कोरोनाग्रस्त गरोदर महिलेने अर्भकाला जन्म दिला. त्या अर्भकाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. आई पॉझिटिव्ह आहे. आईपासून अर्भकाला लागण होऊ नये म्हणून त्या अर्भकाला बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात हलविण्यात आले आहे. तिथे डॉक्टर काळजी घेत आहेत. दरम्यान, राज्यातून आतार्यंत 1 लाख 20 हजार लोक गोव्याबाहेर गेले. एकूण 55 रेल्वेगाड्यांमधून मजूर त्यांच्या मूळगावी गेले.