CoronaVirus News: गोव्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण २.८३ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 09:47 PM2020-07-14T21:47:29+5:302020-07-14T21:47:52+5:30
पॉझिटिव्ह रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.६ टक्के
पणजी : गोव्यात कोवीड चाचणीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण २.८३ टक्के एवढे आहे. तर पॉझिटिव्ह रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.६ टक्के आहे. आरोग्य खात्याच्या अधिकृत आकडेवारी वरून हे स्पष्ट झाले. आतापर्यंत ९१ हजार १८२ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील २.८३ टक्के पॉझिटिव्ह आढळले.
राज्यात आतापर्यंत कोविड पॉझिटिव्हचे १८ बळी गेले आहेत. आज मंगळवारी चिखली वास्को येथे ४७ वर्षीय इसमाचे निधन झाले. केवळ मुरगांव तालुक्यातच ५६२ पॉझिटिव्ह रुग्ण या घडीला आहेत. वास्कोत कोवीड पॉझिटिव्ह मुळे होणाऱ्या मृत्यूचे थैमान घातले आहे. मांगुर हिलचे नगरसेवक पाश्कॉल डिसूजा (७५) यांचाही कोविडने मृत्यू झालेला आहे.
राज्यात २२ जून रोजी कोविडचा पहिला मृत्यू झाला. उत्तर गोव्यातील मोर्ले, सत्तरी या खेडेगावात ८५ वर्षीय वृद्धाचे निधन झाले. त्याच दिवशी खारीवाडा, वास्को येथील ५८ वर्षीय इसम दगावला. पाच दिवसांच्या अंतराने २७ जून रोजी फातोर्डा येथील ७६ वर्षीय महिलेला मृत्यू आला. १ जुलै रोजी राजधानी पणजी परिसरात ताळगाव येथे ६६ वर्षांचा इसम मरण पावला. ३ जुलै रोजी दोन बळी गेले. यात कुडतरी येथील ७४ वर्षीय महिलेचा आणि खारी वाडा वास्को येथील ४५ वर्षीय इसमाचा समावेश आहे. ५ जुलै रोजी चिखली वास्को येथे ७२ वर्षीय इसम मरण पावला. ६ जुलै रोजी साखळी येथे देसाई नगर भागात ६५ वर्षे इसमाचा मृत्यू झाला. ९ जुलै रोजी नवे वाडे वास्को येथे ५० वर्षीय पुरुष मृत्यू पावला. त्यानंतर ११ जुलै रोजी वास्कोत तीन बळी गेले रूमडावाडा, वास्को येथे ८० वर्षीय वृद्धेचे निधन झाले. त्याच दिवशी दुपारी बायणा वास्को येथील ३१ वर्षीय तरुण दगावला आणि नंतर खारीवाडा येथे ७५ वर्षीय इसम दगावला. चिखली येथे महिला दगावली त्यानंतर पाळोळे, काणकोण येथील ४९ वर्षीय इसमाचे निधन झाले. १३ जुलै रोजी तीन बळी गेले. यात वास्को येथील ४७ वर्षीय महिला, बेलाबाय वास्को येथील ६० वर्षीय वृद्धा आणि वरुणापुरी, वास्को येथील ५८ वर्षीय इसमाचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी मडगाव येथे स्वतंत्र इस्पितळ आहे. दक्षिण जिल्हा इस्पितळाचा कोविड इस्पितळ म्हणून सध्या वापर केला जात आहे. या ठिकाणी २०० खाटा आहेत. याशिवाय कोविड निगा केंद्रेही आहेत.