Coronavirus : जनता कर्फ्यूची सूचना पाळण्यासाठी गोमंतकीय सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 01:02 PM2020-03-20T13:02:04+5:302020-03-20T13:03:30+5:30
Coronavirus: जनता कर्फ्यूची सूचना येत्या रविवारी अंमलात आणण्यासाठी गोमंतकीय सज्ज होऊ लागले आहेत.
पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर गोव्यातून या आवाहनाचे स्वागत होत आहे. एरव्ही पंतप्रधानांवर टीका करणारेही काही गोमंतकीय पंतप्रधानांची जनता कर्फ्यूची भूमिका योग्य असल्याचे मत नोंदवू लागले आहेत. जनता कर्फ्यूची सूचना येत्या रविवारी अंमलात आणण्यासाठी गोमंतकीय सज्ज होऊ लागले आहेत.
पंतप्रधानांच्या आवाहनाची सर्वप्रथम गोवा सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगालाही दखल घ्यावी लागली. गुरुवारी रात्री अकरा वाजता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. कारण रविवारी गोव्यात जिल्हा पंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होणार होते. मतदानावेळी गर्दी होईल व जनता कर्फ्यूचेही पालन करता येणार नाही याची कल्पना सरकारला आली. रविवारच्या जिल्हा पंचायत निवडणुका पुढे ढकला अशी मागणी सोशल मीडियावरून लोक करू लागले. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली. तत्पूर्वी पंतप्रधानांच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी संपर्क साधला व गोव्यातील निवडणुकांविषयी कल्पना दिली. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया रविवारऐवजी पुढील मंगळवारी पार पाडावी असे गोवा सरकारने निवडणूक आयोगाशी चर्चा करून ठरविले.
आयोगही तयार झाला. रविवारी त्यामुळे गोमंतकीयांना घराबाहेर पडण्याची गरज राहणार नाही. जनता कर्फ्यूचे पालन करणो शक्य होईल. मात्र देशात व गोव्यात कोरोना विषाणूबाबत भीतीचे वातावरण असताना मंगळवारी तरी निवडणुका का घ्यायला हव्यात, निवडणुका रद्द करा, अशी मागणी विरोधी पक्ष व काही सामाजिक कार्यकर्तेही करू लागले आहेत पण गोवा सरकारने व भाजपने जिल्हा पंचायत निवडणूक हा प्रतिष्ठेचा विषय बनवला आहे.
जनता कर्फ्यूचे पालन करून रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत गोमंतकीय स्वत:च्या घरीच राहणे पसंत करतील अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. गोवा हे पर्यटन राज्य आहे. देश-विदेशातून पर्यटक गोव्यात येतात. या पार्वभूमीवर गोव्याला अधिक काळजी घ्यायला हवी, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांचेही म्हणणो आहे. जनता कफ्यरूचे पालन गोमंतकीयांनी करावे, अशी अपेक्षा मंत्री मायकल लोबो यांनीही व्यक्त केली.