Coronavirus Goa Updates : गोव्यात कोरोनाचे मृत्यू थांबेनात, आणखी ४४ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 06:49 PM2021-05-20T18:49:32+5:302021-05-20T18:54:58+5:30
Coronavirus Goa Updates : बळींची संख्या कमी झाली तरी, रोज चाळीसहून अधिक कोरोनाग्रस्तांचे जीव जात आहेत.
पणजी : राज्यात कोरोनामुळे जात असलेले मृत्यू काही थांबत नाहीत. बळींची संख्या कमी झाली तरी, रोज चाळीसहून अधिक कोरोनाग्रस्तांचे जीव जात आहेत. बुधवारी तुलनेने कमी मरण पावले पण गुरुवारी ४४ नव्या बळींची नोंद झाली. वास्को येथील एका ६२ वर्षीय महिलेने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते पण तरी तिचा कोरोनाने जीव घेतला.
दर चोवीस तासांत ३५ ते ४० कोरोना रुग्णांचे बळी का जात आहेत याचा शोध सरकारने घेण्याची खूप गरज निर्माण झालेली आहे. अजुनही बांबोळीच्या गोमेकॉ रुग्णालयातच जास्त रुग्णांचे जीव जात आहेत. १५ मे रोजी ५८ कोरोनाग्रस्त मरण पावले. १६ रोजी ४३ कोरोना रुग्ण दगावले. १७ रोजी ५३ मरण पावले. १८ रोजी ४५ कोरोनाग्रस्तांनी अखेरचा श्वास घेतला. १९ रोजी ३१ दगावले.
काल गुरुवारी वास्कोतील जी २२ वर्षीय महिला दगावली, तिला अन्य एक आजारही होता. तिने कोरोनालसीचे दोन्ही डोस घेतले होते. तीन रुग्ण असे मरण पावले, ज्यांनी कोरोना लसीचा एक डोस घेतला होता. मुरगावमधील ५५ वर्षीय महिला दगावली. ताळगावमधील ६६ वर्षीय पुरुष रुग्ण मरण पावला. या दोघांनीही कोरोना लसीचा एक डोस घेतला होता. करंजाळे येथील ८२ वर्षीय रुग्णानेही पहिला डोस घेतला होता. त्याचेही गुरुवारी निधन झाले.
वयाची पन्नाशी देखील न गाठलेले काही रुग्ण गुरुवारी मरण पावले. त्यात आमोणा येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्ण, कुडचडे येथील ४९ वर्षीय इसम, सांगेतील ४४ वर्षीय रुग्ण आणि कुडतरी येथील ४९ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तसेच साखळी येथील ५० वर्षीय इसमही काल कोरोनाने दगावला. गुरुवारी साखळीतील एकूण तिघेजण मरण पावले आहेत. ताळगाव, शिवोली येथील प्रत्येकी दोघे मरण पावले. केपे, कुडका, अंजुणा, मडगाव, म्हापसा, कुंकळ्ळी, फोंडा, पेडणे, डिचोली, माजोर्डा, कारवार, म्हार्दोळ येथील काही रुग्ण दगावले.