Coronavirus : गोव्यात आता कडक उपाययोजना होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 08:17 PM2020-03-20T20:17:57+5:302020-03-20T20:18:15+5:30
Coronavirus :कर्नाटक व महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांनाही सीमेवर रोखण्याची उपाययोजना केली जाण्याची दाट शक्यता आहे.
पणजी : गोव्यात कोरोनाचा एकही रुग्ण अजून सापडलेला नाही, ही चांगली गोष्ट आहे. विदेशी पर्यटकांची दाबोळी विमानतळावर तपासणी केली जातेच. मात्र यापुढे देशी पर्यटकांचीही तपासणी करावी लागेल. तसेच कर्नाटक व महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांनाही सीमेवर रोखण्याची उपाययोजना केली जाण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी त्याविषयीचे संकेत दिले. एकदा जिल्हा पंचायत निवडणूक आटोपली की मग कडक उपाययोजना सुरू होईल, असे ते म्हणाले.
मध्य पूर्व राष्ट्रांमधून गोव्यात अनेक पर्यटक येतात. शिवाय, तिथे जे गोमंतकीय काम करत होते, त्या गोमंतकीयांनीही गोवा गाठण्यास आरंभ केला आहे. या सर्वाची दाबोळी विमानतळावर आता तपासणी केली जातेच पण देशी पर्यटकांचीही यापुढील काळात तपासणी केली जाईल. काही पर्यटक मुंबईत जहाजाने येतात व मग मुंबईहून ते देशी विमानाने गोव्यात येतात. यापुढे सर्वच देशी पर्यटकांचीही तपासणी करावी लागेल. त्यासाठी ज्यादा थर्मल स्कॅनर्स आम्ही घेत आहोत. प्रत्यक्ष खरेदीचे काम जिल्हाधिकारी करतील, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
गोव्यात कडक उपाययोजना
आम्ही प्रत्येक पब, स्पा वगैरे बंद केले आहेत. कॅसिनोही बंद केले. याचे कारण जनतेच्या हिताची सरकारला काळजी आहे. कडक उपाययोजना करावीच लागते. आठवडय़ाचे बाजारही बंद केले. यापुढील पाऊलेही भविष्यात उचलावी लागतील. कारण गोव्यात कोरोनाचा रुग्ण सापडला तर समस्या निर्माण होईल. हॉटेलमधील विवाह सोहळेही बंद करण्याचे आदेश आम्ही दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कफ्यरूचे आवाहन केले आहे. जनता कफ्यू हाच उपाय आहे, असे मंत्री राणे म्हणाले.