CoronaVirus : गोव्यातील 62 संभाव्य कोरोना बाधितांचे अहवाल 'निगेटिव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 12:58 PM2020-04-02T12:58:33+5:302020-04-02T13:28:36+5:30
CoronaVirus : गोवा सरकारच्या गोमेकाॅ इस्पितळातील प्रयोगशाळा आता पूर्णपणे काम करू लागली आहे.
पणजी : गोव्यातील संभाव्य कोरोना बाधितांचे गेल्या 48 तासांत जे अहवाल प्रयोगशाळांमधून आले, ते पाहता गोवा आता सुरक्षित झोनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण 62 संभाव्य कोरोनाग्रस्तांचे अहवाल आले व हे सगळे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामुळे या अहवालावरून कुणालाच करोनाची लागण झाली नसल्याचे समजते
गोवा सरकारच्या गोमेकाॅ इस्पितळातील प्रयोगशाळा आता पूर्णपणे काम करू लागली आहे. प्रयोगशाळा सुरू झाली तेव्हा तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्या अडचणींवर तज्ज्ञांनी मात करत प्रयोगशाळेतील चाचणीच्या प्रक्रिया यशस्वी करून दाखविल्या. गोमेकाॅच्या प्रयोगशाळेत अगोदर 14 जणांच्या कोरोना चाचण्या केल्या. त्या नकारात्मक आल्या. पुण्याच्या प्रयोगशाळेत एकूण 55 जणांचे नमुने सरकारने नौदलाच्या विमानाने पाठवले होते. त्यापैकी 48 नमून्यांविषयी गुरूवारी सकाळी नकारात्मक अहवाल आले. ही माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी 'लोकमत'ला दिली.
गोव्याच्या सीमा सरकारने पूर्ण सील केल्या आणि गोमंतकीयांनीही घरातच राहणे पसंत केल्याने कोरोनाचा प्रसार झाला नाही. गोव्यात आतापर्यंत फक्त पाच कोरोना रुग्ण सापडले पण त्या पाचपैकी चौघे विदेशातूनच कोरोना विषाणू घेऊन आले होते. सर्व पाच रुग्णांची स्थिती स्थिर आहे असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
गोमेकाॅ इस्पितळाच्या प्रयोगशाळेत झालेल्या आणखी पाच चाचण्यांचे अहवाल उद्यापर्यंत येणे अपेक्षित आहे. गोमेकाॅच्या आयसोलेशन विभागात एकूण 32 संभाव्य कोरोना बाधित उपचार घेत आहेत.