Coronavirus: गोव्यात क्वारंटाइन केंद्रांना गावागावात वाढता विरोध; ग्रामस्थ करु लागले मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 02:32 PM2020-05-24T14:32:06+5:302020-05-24T14:32:23+5:30
परराज्यांमधून तसेच विदेशातून गोव्यात येणाºया प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या रेसिडेन्सी तसेच काही खाजगी हॉटेल्स व अन्य आस्थापने सरकारने घेतलेली आहेत
पणजी : आपल्या गावात क्वारंटाइन केंद्रे नकोच असा आक्रमक पवित्रा घेत गोव्यात ठिकठिकाणी ग्रामस्थ उठाव करु लागले आहेत. गेल्या आठवड्यात कांदोळी येथे मध्यरात्रीच्या सुमारास लोक जमले आणि गावात क्वारंटाईन करण्यास विरोध केला त्यानंतर शनिवारी दक्षिण गोव्यात बेतालभाटीतही असाच प्रकार घडला. सोमवारपासून राज्यात प्रवाशांची संख्या वाढणार आहे या गर्दीमुळे गावागावांमधील हॉटेलांमध्ये क्वारंटाइन करावे लागेल त्यामुळे पुढील काही दिवसात या विरोधाची तीव्रता आणखी वाढणार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरही पेच निर्माण झालेला आहे.
परराज्यांमधून तसेच विदेशातून गोव्यात येणाºया प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या रेसिडेन्सी तसेच काही खाजगी हॉटेल्स व अन्य आस्थापने सरकारने घेतलेली आहेत. मात्र प्रवाशांना तेथे पाठवल्यानंतर स्थानिक लोक विरोध करतात. शनिवारी बेतालभाटी येथे एका हॉटेलमध्ये क्वारंटाइनसाठी नेलेल्या आठजणांना स्थानिकांनी अडवून मज्जाव केला. माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको, बेतालभाटीचे सरपंच कोंसेसांव मिरांडा हे विरोधकांचे नेतृत्त्व करीत होते. शेवटी या आठ प्रवाशांना क्वारंटाइनसाठी कोलवा येथील हॉटेलमध्ये हलवावे लागले.
पर्यटन सचिवांनी अलीकडेच राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत १७00 नव्या खोल्या सरकारने प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी सज्ज ठेवल्या असल्याची माहिती दिली. या खोल्या खास करुन किनारपट्टीत असलेल्या हॉटेलांमधील आहेत.
गोवेकर खलाशांनी जावे कुठे? - आग्नेल फर्नांडिस
काँग्रेसचे प्रवक्ते तथा कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी विरोधकांनी गोमंतकीय खलाशांनी जावे कुठे? असा सवाल केला आहे. ते म्हणाले की, ‘कांदोळीतील वाडी येथील ज्या हॉटेलात गोमंतकीय खलाशांना क्वारंटाइनसाठी मज्जाव करण्यात आला त्या विस्परिंग पाल्म हॉटेलपासून जवळ असलेल्या दुसºया एका हॉटेलात काही दिवसांपूर्वी परराज्यातील प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांना कोणीच विरोध केला नाही. खलाशी मुंबईहून ‘कोरोना निगेटिव्ह’ असल्याचे दाखले घेऊन आले होते त्यामुळे त्यांना विरोध करण्याची गरज नव्हती.
अभिनेत्री पूजा बेदीला सवलत का?
आम आदमी पक्षाचे निमंत्रक एल्विस गोम्स म्हणाले की, ‘ग्रामस्थांची ही भूमिका चुकीची आहे. परंतु लोकांनाही दोष देऊन चालणार नाही कारण सरकारने पुरेशी जागृती केलेली नाही. एडस्पेक्षाही हे भयंकर दुखणे बनलेले आहे. केवळ निगराणीखाली ठेवण्यासाठी म्हणून प्रवाशांना क्वारंटाइन केले जाते, ते पॉझिटिव्ह रुग्ण असतात असे नव्हे. उद्या इस्पितळांच्या परिसरात राहणारे लोकही विरोध करतील. याला काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे सरकारने गावागावात तज्ञ डा्रॅक्टरना पाठवून आधी लोकांमध्ये जागृती करायला हवी.