Coronavirus: गोव्यात पर्यटन सुरू करण्यासाठी आग्रह, दोनशे हॉटेलांकडून अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 06:08 PM2020-06-20T18:08:31+5:302020-06-20T18:08:47+5:30
कोविडमुळे सगळे बार, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स गेल्या मार्चपासून बंद आहेत. देशाच्या जीडीपीच्या दहा टक्के परिणाम पर्यटन धंदा बंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे.
पणजी : राज्याचे पर्यटन टप्प्याटप्प्याने सुरू केले जावे अशी मागणी गोवा टूर अॅण्ट ट्रॅव्हल असोसिएशनने शनिवारी सरकारकडे केली आहे. राज्यातील दोनशे हॉटेलांनी हॉटेल्स सुरू करण्यासाठी पर्यटन खात्याकडे अर्ज केले पण सरकारने अजून मान्यता दिलेली नाही व हॉटेल्सही सुरू झालेली नाहीत असे संघटनेचे अध्यक्ष निलेश शाह यांनी नमूद केले आहे.
कोविडमुळे सगळे बार, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स गेल्या मार्चपासून बंद आहेत. देशाच्या जीडीपीच्या दहा टक्के परिणाम पर्यटन धंदा बंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे. गोव्यात हा परिणाम 40 टक्के आहे. त्या शिवाय अन्य अनेक परिणाम झाले आहेत, असे शाह यांनी म्हटले आहे. आणखी जास्त काळ हॉटेल्स किंवा पर्यटन बंद राहू शकत नाही. यामुळे बेरोजगारीत भर पडेल व महसुलाचीही हानी होईल. देशाच्या विविध भागांमध्ये पर्यटन व्यवसाय खुला होत आहे. गोव्यातही त्याच पद्धतीने मार्गदर्शक तत्त्वे व प्रक्रिया आणून हॉटेल्, बार व रेस्टॉरंट्स सुरू करायला हवीत अशी मागणी संघटनेने केली आहे. बार व रेस्टॉरंट्स सुरू करायला सरकारकडून परवानगी मिळाल्याशिवाय हॉटेल्सही खुली करता येत नाहीत. हॉटेल सुरू करताना बार व रेस्टॉरंट्सही खुली करण्यासाठी मान्यता मिळायला हवी, असे शाह यांनी म्हटले आहे. राज्यात हजारो हॉटेल्स आहेत, ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे पण सद्या दोनशेजणांनीच अर्ज केले आहेत. गेल्या 8 जून रोजी सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंट्स खुली व्हावीत असे अपेक्षित होते. मात्र अर्ज सरकारने मागून घेतल्यानंतर त्या अर्जाना अजुनही मान्यता दिली गेलेली नाही यावर संघटनेने बोट ठेवले आहे.