CoronaVirus News : कोरोना काळात गोव्याचे पर्यटन नव्याने सुरू करणे धोक्याचे?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 12:11 PM2020-05-12T12:11:37+5:302020-05-12T12:11:58+5:30
कोरोना काळात गोव्याचे पर्यटन नव्याने सुरू करणे किती सुरक्षित आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदगुरू पाटील
पणजी : गोवा कोरोनामुक्त राज्य असले तरी, गोव्यात लॉकडाऊन कायम आहे व 144 कलमही कायम आहे. गोव्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण अजून सापडत आहेत. मात्र कोरोना काळातही गोवा सरकार गोव्यात पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास उत्सुक बनले आहे. गोव्यातील कॅसिनो व्यावसायिकांच्या हे पथ्यावर पडेल, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. कोरोना काळात गोव्याचे पर्यटन नव्याने सुरू करणे किती सुरक्षित आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या 22 मार्चपासून गोव्याचा पर्यटन व्यवसाय बंद आहे. हजारो पर्यटक घरी परतले. सहा हजारांपेक्षा जास्त विदेशी नागरिकांना सरकारने 31 खास विमानांद्वारे त्यांच्या देशात पोहोचविले. सध्या एक हजार विदेशी नागरिक गोव्यात राहतात, पण त्यांना पर्यटनाची मजा लुटता येत नाही. एरव्ही मे महिन्यात गोव्याचे समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने गजबजायचे. काही लाख पर्यटक गोव्यात असायचे. गोव्याला 105 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून येथे वार्षिक सरासरी 80 लाख पर्यटक येतात. मात्र सध्या कोरोना संकट काळात सगळे काही ठप्प झालेले आहे. विमानेही बंद आहेत व आंतरराज्य मार्गावरील बस वाहतूकही बंद आहे. गोव्यातील मांडवी नदीतील कॅसिनो जुगार कधीच बंद होत नसे पण तो देखील दोन महिने बंद राहिला. एरव्ही कॅसिनोच्या ठिकाणी रोज काही कोटी रुपयांची उलाढाल होत असे. आता सगळेच बंद आहे. किनारपट्टीतील अर्थव्यवस्था कोलमडून पडली. शॉक व्यवसाय बंद झाला. हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद झाली. एकदा पर्यटक कॅसिनोंवर गर्दी करू लागले की, मग त्यांच्यावर कुणाचे नियंत्रणही राहणार नाही व सोशल डिस्टन्सिंगलाही हरताळ फासला जाईल हे काही विरोधी आमदारही मान्य करतात.
गोवा सरकार आता नव्याने गोव्यात पर्यटकांचे स्वागत करू पाहत आहे. देशातील अन्य राज्यांपेक्षा व विदेशी पर्यटन स्थळांपेक्षा गोवा हेच सुरक्षित पर्यटन स्थळ आहे ही गोष्ट खरी आहे. मात्र गोव्यात पर्यटकांचा ओघ जर अर्निंबध पद्धतीने सुरू झाला तर गोव्याचा ग्रीन झोन दर्जा पुन्हा धोक्यात येऊ शकतो, अशी चर्चा सोशल मिडियावर सुरू झाली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मते गोव्यात येणा-या प्रत्येक व्यक्तीची गोव्यात कोरोना चाचणी केली जाते. गोवा सरकार पर्यटन धंदा सुरू करण्याबाबत स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) म्हणजे सुरक्षित अशी प्रक्रिया तयार करील, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. गोव्याला पर्यटन सुरू करतानाच काळजीही घ्यावी लागेल, कारण गोव्याच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडतात हेही गोव्याचे मुख्यमंत्री मान्य करतात.
गोव्याच्या सीमा अजून बंदच आहेत. येत्या 18 पासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होईल. गोव्याने पर्यटकांना बोलावले तरी, पर्यटक गोव्यात येऊ लागतील काय हा देखील प्रश्नच आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे पर्यटन खाते आहे. आजगावकर यांच्या मते गोव्याचे पर्यटन शून्य झालेले आहे. आम्हाला शून्यातून सुरूवात करावी लागेल. 1964 साली गोवा जसा हिरवागार व निसर्गसंपन्न होता, तसा गोवा आम्हाला लोकांसमोर प्रोजेक्ट करावा लागेल, असे आजगावकर यांचे म्हणणे आहे.