coronavirus : राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन, मंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 08:05 PM2020-04-08T20:05:52+5:302020-04-08T20:06:19+5:30
144 कलम हे राज्य कोरोनामुक्त होईपर्यंत कायम असावे, असेही मंत्रिमंडळाने ठरविले असल्याचे मंत्र्यांचे म्हणणे आहे.
पणजी : राज्यात सध्या असलेले लॉकडाऊन यापुढेही सुरू ठेवावे की नाही याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे येत्या 13 रोजी आपला निर्णय जाहीर करतील. तथापि, गोवा मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकी वेळी सर्वच मंत्र्यांनी येत्या 30 पर्यंत लॉकडाऊन असावे अशी भूमिका घेतली. मॉल्स, कॅसिनो, रेस्टॉरंट्स तर सुरू होऊच नयेत व राज्याच्या सीमा बंदच राहायला हव्यात यावरही मंत्र्यांचे एकमत झाले. राज्यात 144 कलम हे गोवा कोरोनामुक्त होईपर्यंत कायम असावे, असेही मंत्रिमंडळाने ठरविले असल्याचे मंत्र्यांचे म्हणणे आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेविषयी व मंत्र्यांनी केलेल्या सूचनांविषयी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी माहिती दिली. पावसाळ्य़ात कोरोना विषाणू कसा वागेल ते कुणीही सध्या सांगू शकत नाही. गोव्याने त्यामुळे काळजी घ्यावीच लागेल, असे मंत्री राणे म्हणाले. लॉकडाऊन येत्या 30 पर्यंत कायम असावा, सोशल डिस्टन्सिंग सांभाळून सरकारी व खासगी कामे सुरू करता येतील, पण सामूहिक एकत्रीकरण केले जाऊ नये, अशा प्रकारच्या सूचना बहुतेक मंत्र्यांनी बैठकीत केल्या. राज्याच्या सीमा सध्या सील आहेत. त्या सीमा यापुढील काळातही सील असायला हव्यात, असे राणे म्हणाले. विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनीही अशा प्रकारचीच माहिती पत्रकारांना दिली. जर यापुढे विमाने सुरू झाली तर विमानतळांवर व रेल्वे स्थानकांवर कायम चाचणी व्हावी. तसेच जे प्रवासी गोव्यात येतात त्यांच्याकडून कोरोनामुक्त असल्याचे प्रमाणपत्र घेतले जावे, असे मंत्री राणे व लोबो म्हणाले.
मी सर्व मंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. पंतप्रधान मोदी यांना मी गोवा सरकारची भूमिका अगोदर कळवेन व मग येत्या 13 रोजी ती भूमिका गोव्याच्या जनतेसाठी जाहीर करीन. येत्या 11 रोजी मोदी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सही होणार आहे. गोव्यातील कोणत्या सेवा सुरू राहतील व लॉकडाऊन किती काळ चालेल, याविषयी आपण 13 रोजी भाष्य करेन, असंही मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले आहेत.