CoronaVirus : अनेक मत्स्यप्रेमी गोमंतकीयांची शाकाहाराला फोडणी, मांसाहार लॉकडाऊन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 03:27 PM2020-04-03T15:27:48+5:302020-04-03T15:28:43+5:30
coronavirus : एकूण गोमंतकीयांपैकी 50 टक्के तरी गोमंतकीयांना गेले आठ ते दहा दिवस मासे मिळाले नाहीत.
- सदगुरू पाटील
पणजी : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे गोमंतकीयांची माशांविना गेले आठ दिवस तरी बरीच अडचण झाली. मत्स्यप्रेमासाठी जगात प्रसिध्द असलेल्या एकूण गोमंतकीयांपैकी 50 टक्के तरी गोमंतकीयांना गेले आठ ते दहा दिवस मासे मिळाले नाहीत.
अनेक गोमंतकीयांशी संवाद साधल्यानंतर ही गोष्ट अधिक स्पष्ट होते. एरव्ही चतुर्थीवेळीच दोन किंवा पाच दिवस शाकाहारी जेवणावर दिवस ढकलून पुन्हा मत्स्य आहाराकडे धाव घेणाऱ्या अनेक गोमंतकीयांनी गेले आठ दहा दिवस शाकाहार सहन केला. काही भागात बांगडे, सुंगटे असे मासे मिळाले पण अनेक गोमंतकीयांनी ते खरेदी न करणे पसंत केले.
लॉकडाऊनच्या काळात फार कमी गोमंतकीय कुटूंबांनी घराबाहेर जाऊन मासे घरात आणण्याचा धोका पत्करला. माशांवीना जास्त दिवस जेवण चालत नाही अशा काही गोमंतकीयांनी स्वत:च्या घरी दोन तीन दिवस मासे मागवून घेतले. काहीजणांनी घरात मुले माशांशिवाय जास्त जेवत नाहीत म्हणून मासे आणण्याची धडपड केली. काही गोमंतकीय कुटूंबांनी आम्हाला मासे नको, आम्ही कोरोनापासून वाचल्यानंतर हवे तेवढे मासे खाऊ अशी भावना व्यक्त केली.
मासे दिसले म्हणून गोमंतकीयांनी गर्दी करुन सोशल डिस्टनसिंगचा फज्जा करु नये असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
खोर्जुवे येथील फक्रू पणजीकर या ज्येष्ठ नागरिकाने 'लोकमत'ला सांगितले की आम्ही दहा दिवस घराबाहेरच पडलो नाही. आम्ही शाकाहारातच समाधानी आहोत. शाकाहारच आरोग्याला चांगला.
पणजीतील प्रशांत सरदेसाई म्हणाले की, गोमंतकीय घरात सुकी मासळी ठेवत असतात. त्याचा लाभ अशा काळात होतो. माझ्या स्वत:च्या फ्रीजमध्ये थोडी सुंगटे तेवढी होती.
गणेशपुरी म्हापसा येथील श्रीपाद नाईक यांनी सांगितले की आम्ही आठ दहा दिवस मासे खरेदी केलेच नाही. गणेशपुरी येथे मासे विक्रीचे वाहन आले तरी आम्ही मासे घेतले नाही.
करंजाळे येथील व्यवसायिक गुरुदास कामत म्हणाले की फक्त दोन दिवस आमच्या घरी मासे आले, अन्यथा आम्हीही शाकाहारच अनुभवला.