CoronaVirus News: वास्कोतील विविध मार्केटमधील व्यापाऱ्यांनी स्वत: बंद ठेवली त्यांची दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 09:05 PM2020-06-08T21:05:20+5:302020-06-08T21:05:30+5:30
दुकाने बंद ठेवण्यासाठी कोणाचाच दबाव नसून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी व्यवसाय बंद ठेवल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले
वास्को: दक्षिण गोव्यात असलेल्या वास्को शहरातील मंगोरहील भागात बऱ्याच प्रमाणात कोविड १९ चे रुग्ण आढळल्यानंतर आता येथील अन्य काही भागात कोविड १९ रुग्ण आढळल्याने याचा फैलाव रोखण्यासाठी वास्कोतील विविध बाजारात असलेल्या दुकानदारांनी स्वताच्या मर्जीने आपला व्यावसाय पूर्णपणे बंद ठेवल्याचे सोमवारी (दि.८) दिसून आले. सोमवारी वास्कोतील भाजी मार्केट, फळ विक्रीची दुकाने - गाडे, मुरगाव नगरपालिकेचे मोर्डन मार्केट अशा बाजारातील सर्व दुकाने बंद असल्याचे दिसून आले. एके बाजूत वास्कोत असलेल्या काही बाजारातील दुकाने पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले तर दुसऱ्या बाजूला शहरातील विविध ठिकाणी असलेली दुकाना, व्यवसाय बऱ्याच प्रमाणात चालू असल्याचे दिसून आले.
वास्कोतील मंगोरहील भागात मागच्या आठवड्यात कोविड १९ चे रुग्ण आढळल्यानंतर सरकारने हा भाग ‘कंण्टेनमेण्ट झोन’ म्हणून घोषित करून कडक पोलीस सुरक्षा बंदोबस्तात तो सील केला. ‘कंण्टेनमेण्ट झोन’ केल्यामुळे याभागात राहणाºयांना बाहेर येण्यास तसेच बाहेरील लोकांना आत जाण्यास सद्या बंदी घालण्यात आलेली आहे. मंगोरहील भागात कोविड १९ चे रुग्ण आढळल्यानंतर (मंगोरहील भागातून सुमारे २०० च्या आसपास कोविड १९ चे रुग्ण आढळलेले आहेत) या भागातून याचा वास्कोतील अन्य भागात फैलाव न व्हावा यासाठी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी काही दिवसापूर्वी वास्कोत पूर्णपणे लॉकडाऊन करण्याची मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी केली होती. तसेच रविवारी (दि.७) पंचायतमंत्री तथा दाबोळीचे आमदार मवीन गुदिन्हो यांनी सुद्धा कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी वास्कोत १०० टक्के लॉकडाऊन करण्याची मागणी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री तथा गोवा सरकारने अजून पर्यंत वास्कोत लॉकडाऊन करण्याचा आदेश जारी केला नसल्याने सोमवारी वास्कोत असलेल्या काही मार्केटमधील दुकानदारांनी आपला व्यवसाय १०० टक्के बंद केल्याचे दिसून आले. यात वास्कोतील भाजी - फळ मार्केट, वास्कोतील मुरगाव नगरपालिकेचे मोर्डन मार्केट मधील दुकानदारांचा समावेश असल्याचे दिसून आले. आम्हाला आमचा व्यवसाय बंद करण्याबाबत कोणीच सांगितलेले नसल्याची माहीती या मार्केटमधील काही दुकानमालकांनी देऊन कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी आम्ही स्वता आमची दुकाने बंद केल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही तुमचा व्यवसाय कीती दिवस बंद ठेवणार असा सवाल केला असता सद्या आम्ही दुकाने दोन दिवस बंद ठेवण्याचे ठरवले असून वेळ पडल्यास सात दिवसही दुकाने बंद ठेवण्यासाठी तयारी असल्याची माहिती या मार्केटमधील काही दुकान मालकांनी दिली. वास्कोतील काही मार्केटमधील दुकाने पूर्णपणे बंद असल्याचे एका बाजूने दिसून आले तर दुसऱ्या बाजूला वास्कोतील विविध ठिकाणी असलेली दुकाने, व्यवसाय चालू असल्याचे दिसून आले. वास्कोत कदाचित सरकार पुन्हा लॉकडाऊ करू शकते असा विचार अनेकांच्या मनात असल्याने वास्कोतील नागरिक विविध दुकानात, आस्थापनात सामग्री खरेदी करण्यासाठी येत असल्याचे सोमवारी दिसून आले.
मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांच्याशी या विषयात चर्चा केली असता मंगोरहील, वास्को भागातून कोविड १९ चे रुग्ण आढळल्यानंतर आता शांतीनगर, बायणा, नवेवाडे अशा अन्य काही भागातून सुद्धा कोविड १९ चे रुग्ण आढळल्याने नागरिकात भिती वाढलेली असल्याचे सांगितले. सद्या वास्कोत लॉकडाऊन करण्याची गरज असून असे केले तरच कोरोना विषाणीच्या फैलावावर रोख लावणे शक्य होणार असल्याची प्रतिक्रीया त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या २५ सही नगरसेवकांशी आपण संपर्क करून याविषयाबाबत चर्चा केली. या चर्चेतून असे ठरवण्यात आले आहे की वास्कोतील विविध भागात असलेले दुकानदार, विविध व्यवस्थापन, व्यापाऱ्यांना कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी काही दिवस त्यांचा व्यवसाय बंद ठेवण्याची वाहन फिरवून मागणी करण्यात येईल अशी माहीती नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी दिली. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी वास्कोतील विविध मार्केटमध्ये असलेल्या दुकानदारांनी सोमवारी आपला व्यवसाय बंद ठेवून खरोखरच चांगले काम केले असल्याची माहीती नगराध्यक्ष राऊत यांनी देऊन कोरोना चा फैलाव रोखण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कोविड १९ चे रुग्ण आढळल्यानंतर मंगोरहील भागाला ‘कंण्टेनमेण्ट झोन’ घोषित केल्यानंतर येथे राहणाºया नागरिकांची कोविड १९ बाबत चाचणी करण्यास सुरवात केली होती, मात्र नंतर ती बंद झाल्याने नागरिकात याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. याबाबत नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांना विचारले असता वास्कोतील शहरी आरोग्य केंद्रातील काही कर्मचाºयांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समजल्यानंतर मंगोरहील भागातील (प्रभाग १७) नागरिकांची कोरोना विषाणूबाबत चाचणी बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या तीन दिवसापासून या चाचण्या बंद झालेल्या असून सदर भागातील लोकांच्या कोरोना विषाणूबाबत चाचण्या पन्हा सुरू कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. ‘कंण्टेनमेण्ट झोन’ मध्ये असलेल्या नागरिकांपैकी ज्यांना कोरोना विषाणूबाबत लक्षणे आढळतात त्यांचीच चाचणी करण्याचे आरोग्य खात्याने ठरवलेले असून असे न करता येथे राहणाºया संपूर्ण नागरिकांच्या चाचण्या करणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले. सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी वास्कोत लॉकडाऊन करण्याचा विचार गांर्भीयाने घेणे गरजेचे असून जर संपूर्ण बंद नाही तर वास्कोत सद्याच्या स्थितीत ‘पार्शल बंद’ तरी करणे काळाची गरज असल्याचे राऊत शेवटी म्हणाले.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आम्ही स्वत: व्यवसाय बंद ठेवला आहे: मानुयेल डी’सोझा
वास्कोत असलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या मोर्डन मार्केट (या मार्केटला संडे मार्केट म्हणून सुद्धा ओळखले जाते) मधील व्यापाºयांच्या संघटनेचे अध्यक्ष मानुयेल डी’सोझा यांनी येथील सर्व व्यापाऱ्यांनी त्यांच्या स्वताच्या इच्छेने दुकाने बंद ठेवल्याचे सांगितले. आम्हाला आमचा व्यवसाय बंद करण्यासाठी कोणीही दबाव घातलेला नसून कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी आम्ही स्वत: आमचा व्यवसाय बंद ठेवल्याची माहीती त्यांनी दिली. सद्या आम्ही दोन दिवस व्यवसाय बंद ठेवण्याचे ठरवलेले असून गरज पडल्यास सात दिवस सुद्धा व्यवसाय बंद ठेवण्याची आमची तयारी असल्याची माहिती त्यांनी दिली.