CoronaVirus News: 4000 पेक्षा अधिक खलाशी गोव्याच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 07:09 PM2020-06-10T19:09:00+5:302020-06-10T19:09:10+5:30
एकूण 6 जहाजे भारताच्या दिशेने: आतापर्यंत 2564 जण गोव्यात
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: जगभरात अडकलेले 4000 पेक्षा अधिक खलाशी चालू पंधरवड्यात गोव्यात येणार असून या खलाशाना घेऊन 6 जहाजे भारताकडे रवाना झाली आहेत.
गोवा खलाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, काही जहाजे येत्या एक दोन दिवसात पोहोचणार आहेत तर काही जहाजे काहीशा विलंबाने गोव्यात पोहोचतील.
सध्या गोव्यात येणाऱ्या खलाशाना आणि विदेशस्थ गोवेकरांना गोव्यात येण्याच्या अटी शिथिल करण्यात आल्या असून विदेशातून गोव्यात येणाऱ्याठी कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली असून जोपर्यंत चाचणीचा निकाल येत नाही तो पर्यंत त्यांना सशुल्क क्वारंटाईन करून गरजेचे असून त्यात जर निगेटिव्ह आढळल्यास त्यांना 14 दिवस घरात विलग अवस्थेत राहता येणार आहे.
गोव्याचे एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण 2304 खलाशी आणि वेगवेगळ्या 31 देशात अडकलेले 260 गोमंतकीय गोव्यात पोहोचले आहेत. वंदे भारत योजनेखाली दुबईहुन एक विमान गोव्यात आले. त्याशिवाय 11 चार्टर विमानातून खलाशी गोव्यात आले आहेत.
डिक्सन वाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार आता आणखी काही चार्टर विमाने खलाशाना घेऊन गोव्यात येणार आहेत. सध्या या खलाशाना विलग करून ठेवण्यासाठी 31 हॉटेल्स बुक करण्यात आली असून 1819 खोल्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
भविष्यात गरज पडण्याची शक्यता असल्याने पांझरखणी कुंकळी येथील नूसी इस्पितळ सज्ज करून ठेवण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.
हुश्श! क्वारंटाईन पर्यटन संपले एकदाचे
गोवा सरकारने विदेशातून येणाऱ्या भारतीयांसाठी नवीन एसओपी लागू केला असून जर कुणी निगेटिव्ह सापडल्यास त्याला 14 दिवस घरात विलग राहण्याची मोकळीक देण्यात आली आहे त्यावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना हुश्श क्वारंटाईन पर्यटन संपले एकदाचे असे म्हटले. ते म्हणाले, या सरकारच्या निर्णयाला मागचे अडीच महिने गोव्यातून आणि गोव्याबाहेरून जे विरोध करत होते त्या गोयकारवादी शक्तीचा हा विजय असे ते म्हणाले.