CoronaVirus News: गोव्यात अडिच महिन्यांत ११४ महिलांचे कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 12:07 PM2020-12-01T12:07:26+5:302020-12-01T12:07:40+5:30
हजारो महिलांनी याच काळात कोविडवर यशस्वीपणे मात केली आहे.
पणजी : गेल्या अडिच महिन्यांत म्हणजे साधारणत: ७५ दिवसांत राज्यातील एकूण ११४ महिलांचे कोविडने मृत्यू झाले आहेत. या महिला विशेषत: पन्नास व साठ वर्षांवरील वयोगटातील आहेत गेल्या दि. १७ सप्टेंबरपासूनची आरोग्य खात्याकडील आकडेवारी जर अभ्यासली तर ११४ महिला कोरोनाची शिकार झाल्या हे स्पष्ट होत आहे. हजारो महिलांनी याच काळात कोविडवर यशस्वीपणे मात केली आहे.
विशेषत: ज्या महिलांचे वय साठहून कमी होते, अशा अनेक महिला कोरोनाची लागण झाल्यानंतरही वाचल्या. त्यांनी यशस्वी पद्धतीने कोविडशी लढाई केली. मात्र ज्या महिला अगोदरच काही गंभीर आजारांनी किंवा व्याधींनी त्रस्त होत्या, त्यांचा कोरोनाने जीव घेतला. बांबोळीच्या गोमेको इस्पितळात व मडगावच्या ईएसआय इस्पितळात बहुतेकांचे बळी गेले. म्हापसा येथील आझिलो इस्पितळात तसेच दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातही कोविडने काही महिला दगावल्या. ज्या ११४ महिला मरण पावल्या, त्यात ७० वर्षांचे वय पार केलेल्या अनेक महिला आहेत. काही केन्सरग्रस्त तसेच मूत्रपिंड विकाराने त्रस्त महिलाही कोविडमुळे मरण पावल्या.सप्टेंबर महिन्यातील चौदा दिवसांत पंचवीस महिलांचा कोविडने बळी घेतल्याची नोंद झाली आहे. ओक्टोबर महिन्यात साठ महिलांचा कोविडने जीव घेतला आहे.
२४ हजार ६०४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये-
दरम्यान, आतापर्यंत एकूण २४ हजार ६०४ रुग्णांनी होम आयसोलेशन स्वीकारले आहे. रोज सरकारी शंभर ते दीडशे कोविडग्रस्त होम आयसोलेशन स्वीकारत आहेत. साधारणत: पन्नास कोविड रुग्ण रोज इस्पितळात दाखल होत आहेत. ज्या कोविडग्रस्तांना कोविडची कोणती लक्षणे दिसत नाहीत ते घरी राहतात. तसेच सौम्य लक्षणे असलेले रुग्णही घरी राहतात पण अशा रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची व डॉक्टरांच्या कायम संपर्कात राहण्याची गरज असते. अशा रुग्णांची स्थिती पाहून आरोग्य खात्याची यंत्रणा कधी कधी काही रुग्णांना इस्पितळात किंवा कोविड निगा केंद्रातही हलवते.