CoronaVirus News: गोव्यात नवीन 31 रुग्णांची वाढ; कोरोनाबाधितांची संख्या पोहचली 157वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 03:58 PM2020-06-04T15:58:12+5:302020-06-04T15:58:27+5:30
सातजणांची कोरोना चाचणी अनुक्रमे फोंडा व मडगावच्या इस्पितळात केली गेली. ट्रनेट पद्धतीने ते पॉझिटिव्ह आले होते.
पणजी : गोव्यात कोरोनाचा स्थानिक स्तरावरील संसर्ग झपाट्याने वाढला असून मांगोरहीलच्या लोकवस्तीला तर कोरोनाने मोठा विळखा घातल्याचे गुरुवारी अधिक स्पष्ट झाले. सरकारने जरी सामाजिक संसर्ग झाला नाही असा दावा केला तरी, प्रत्यक्षात मांगोरहीलला मोठ्या प्रमाणात झालेली लागण हा स्थानिक स्तरावरील मोठ्या संसर्गाचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे. नवे एकूण 31 कोरोना रुग्ण गुरुवारी आढळले व त्यापैकी 23 एकट्या मांगोरहील- वास्कोमधील आहेत. सात रुग्ण मुंबई व अन्य भागातून गोव्यात रस्तामार्गे आले.
सातजणांची कोरोना चाचणी अनुक्रमे फोंडा व मडगावच्या इस्पितळात केली गेली. ट्रनेट पद्धतीने ते पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर इस्पितळांच्या प्रयोगशाळेतही त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सातपैकी चौघे मूळ मुंबईचे आहेत तर तिघे गोव्यातीलच आहेत. कळंगुट येथे एक महिला येऊन राहिली होती. एका राजकीय नेत्याच्या वशिल्याने मुंबईहून ती काही दिवसांपूर्वी गोव्यात आली होती. ती किनारपट्टीत फिरली होती. तिला श्वासोश्वासाचा काल त्रस जाणवू लागल्याने म्हापशातील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथून बांबोळीला हलविले गेले. तिथे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
मांगोरहीलची रुग्ण संख्या 72
दक्षिण गोव्यातील मांगोरहीलचा भाग हा कंटेनमेन्ट झोन म्हणून तीन दिवसांपूर्वी सरकारने जाहीर केला. काल तिथे कोरोनाचे एकूण 41 रुग्ण सापडले होते. गुरुवारी त्यात आणखी 23 नव्या रुग्णांची भर पडली. मांगोरहीलला तीन दिवसांत एकूण रुग्णसंख्या 72 झाली आहे. आतार्पयत मांगोरहीलला फक्त पाचशे व्यक्तींच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तिथे लोकसंख्या सतरा हजारहून जास्त आहे. मतदारसंख्या 12 हजार आहे. अजून काही हजार व्यक्तींच्या कोरोना चाचण्या मांगोरहीलला केल्या जाणार आहेत.
एकूण संख्या 157
एकूण सातजण रस्तमार्गे गोव्यात आले. त्यातील तिघे गोमंतकीय आहेत. त्यांची चाचणी फोंडय़ाच्या इस्पितळात केली गेली. त्यांनाही मडगावच्या कोविद इस्पितळात उपचारांसाठी दाखल केले गेले आहे. एकूण 1क्क् कोरोना रुग्ण कोविद इस्पितळात सध्या उपचार घेत आहेत. गेल्या दोन महिन्यांत एकूण 57 कोरोना रुग्ण उपचारानंतर ठिक झाले. राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या बुधवारी 126 होती. यात उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे. गुरुवारी एकूण संख्या 157 झाली.
राज्यात कोरोना रुग्ण संख्या पन्नासहून जास्त होणारच नाही असे दीड महिन्यापूर्वी सर्वाना वाटत होते. कारण गोवा पूर्ण सुरक्षित होता व त्यावेळी परप्रांतांमधून गोव्यात वाहनांचा व लोकांचा प्रवेश मर्यादित होता. मात्र जसजसे सगळे व्यवहार सुरू झाले व परप्रांतांमधून लोक येऊ लागले तसतशी रुग्णसंख्या गोव्यात वाढली. कोविद इस्पितळावरील व एकूणच गोव्याच्या आरोग्य यंत्रणोवरील ताण वाढू लागला आहे.
वास्कोत लॉक डाऊन करा अशी मागणी होत आहे. मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉक डाऊनची तूर्त गरज नाही, कारण वास्को शहरात कोरोना रुग्ण सापडले नाही अशी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी वास्को शहराला भेट दिली. तिथे ते मंत्री मिलिंद नाईक, आमदार कालरुस आल्मेदा व अन्य स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटले. त्यांनी बैठक घेऊन स्थितीचा आढावाही घेतला. मांगोरहीलचे अनेक लोक मुरगाव तालुक्यातील विविध आस्थापनांमध्ये एरव्ही काम करतात. अनेक खासगी उद्योगांमध्ये ते जातात. त्यामुळे व्यवसायिक आस्थापनेही सतर्क बनली आहेत.