CoronaVirus News : चिंता वाढली! मुरगाव तालुक्यात ४७७ कोरोनाबाधित रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 08:10 PM2020-07-10T20:10:24+5:302020-07-10T20:10:47+5:30
गोव्यातील १२ तालुक्यापैंकी मुरगाव तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४७७ असल्याने संपूर्ण गोव्यात असलेल्या रुग्णांच्या संख्येत मुरगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची सध्याची संख्या ५४.८९ टक्के असल्याचे दिसून येते.
वास्को: गोव्यात सध्या असलेल्या ८६९ सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांपैंकी ४७७ रुग्ण मुरगाव तालुक्यातील ९ विविध भागातील असल्याने येथेच नव्हे तर संपूर्ण मुरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर गोव्यात मरण पावलेल्या ९ जणांपैकी ४ जण मुरगाव तालुक्यातील वास्को शहरातील असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
मुरगाव तालुक्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने वास्को मतदारसंघातील मंगोरहील, कुठ्ठाळी मतदारसंघातील झुआरीनगर अशा दोन भागात काही काळापूर्वी ‘कंटेनमेण्ट झोन’ केल्यानंतर नुकतेच वास्को मतदारसंघातील खारीवाडा येथील काही भागात ‘कंटेनमेण्ट झोन’ करण्याचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिका-याने काढल्यानंतर शुक्रवारी (दि. १०) पोलीस याबाबत तयारी करताना दिसून आले.
गोव्यात सध्या ८६९ कोरोना बाधा झालेले सक्रीय रुग्ण (९ जुलैच्या अहवालानुसार) असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार चालू आहेत. मुरगाव तालुक्यात कुठ्ठाळी, वास्को, दाबोळी व मुरगाव असे चार मतदारसंघ येत असून ८६९ सक्रीय कोरोनाबाधित रुग्णापैंकी ४७७ रुग्ण मुरगाव तालुक्यातील ९ विविध भागातील आहेत. गोव्यातील १२ तालुक्यापैंकी मुरगाव तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४७७ असल्याने संपूर्ण गोव्यात असलेल्या रुग्णांच्या संख्येत मुरगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची सध्याची संख्या ५४.८९ टक्के असल्याचे दिसून येते.
१ जून रोजी मंगोरहील, वास्को भागातून गोव्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा भाग ‘कंटेनमेण्ट झोन’ करून सीलबद्ध करण्यात आला होता. यानंतर मुरगाव तालुक्यातील विविध भागाबरोबरच गोव्यातील विविध भागात सुद्धा कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरू झाले. मुरगाव तालुक्यात असलेल्या वास्को मतदारसंघातील मंगोरहील भागात ‘कंण्टेनमेण्ट झोन’ केल्यानंतर काही दिवसाने मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी मतदारसंघातील झुआरीनगर झोपडपट्टी व परिसराच्या भागातही कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरवात झाल्यानंतर येथे ‘कंण्टेनमेण्ट झोन’ करण्यात आला.
मुरगाव तालुक्यातील अन्य दोन - तीन भागात काही दिवसापूर्वी ‘मायक्रो कंण्टेनमेण्ट झोन’ करण्यात आलेले आहे. खारीवाडा, वास्को भागातून कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरु झाल्यानंतर याचा फैलाव रोखण्यासाठी गुरूवारी उशिरा रात्री दक्षिण गोवा जिल्हाधिकाºयांनी खारीवाडा येथील काही भाग ‘कंण्टेनमेण्ट झोन’ जाहीर केल्याची माहिती शुक्रवारी (दि.१०) मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी देऊन सदर भाग सीलबद्ध करण्याच्या कामाला सुरवात करण्यात आल्याचे सांगितले.
मुरगाव तालुक्यातील ९ विविध भागातील ४७७ जण सक्रीय कोरोनाबाधित रुग्ण असल्याने त्यांच्यावर सद्या इस्पितळात उपचार चालू आहेत. मुरगाव तालुक्यातील या सक्रीय कोरोना रुग्णापैंकी (९ जुलैच्या अहवालानुसार) सर्वात जास्त झुआरीनगर झोपडपट्टी व जवळपासच्या परिसरातील असून येथील सक्रीय रुग्णांचा आकडा १११ असा आहे. बायणा, वास्को परिसरातील ८७ सक्रीय रुग्ण असून सडा भागातील सक्रीय रुग्णांची संख्या ८४ आहे. नवेवाडे, वास्को परिसरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७३ आहे तर मंगोरहील भागातील रुग्णांची संख्या ६४ असल्याची माहीती उपलब्ध झाली आहे.
खारीवाडा वास्को भागातील सक्रीय रुग्णांची संख्या ४३ असल्याची माहिती उपलब्ध झाली. वेर्णा परिसरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८ तर कुठ्ठाळी भागातील रुग्णांची संख्या ६ अशी आहे. मुरगाव तालुक्यातील दाबोळी मतदारसंघात येणा-या वाडे भागात सर्वात कमी अशी १ सक्रिय रुग्ण असून यासर्वांवर इस्पितळात उपचार चालू आहे. गोव्यात कोरोनाची बाधा झाल्यानंतर ९ जणांचा मृत्यू झाला असून यात मुरगाव तालुक्यात राहणाºया ४ जणांचा समावेश आहे. मुरगाव तालुक्यातील मरण पोचलेले सदर चारही नागरिक वास्कोतील विविध परिसरातील असून मुरगाव तालुक्याचा कोरोनामुळे गोव्यात मरण पोचलेल्यांच्या संख्येत सुमारे ४४ टक्के असा आकडा असल्याचे दिसून येते.
१७ दिवसांच्या काळात (२२ जून ते ९ जुलै) मुरगाव तालुक्यातील चार नागरिकांचा कोरोनाची बाधा झाल्यानंतर मृत्यू झाला. मुरगाव तालुक्यात वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे तसेच मागच्या काळात चार जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गोव्याबरोबरच मुरगाव तालुक्यातही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन सर्व प्रकारची पावले उचलून फैलाव रोखण्यासाठी सद्या काम करत असल्याचे दिसून येत आहे.