CoronaVirus News : गोव्यात कोविडचा ज्येष्ठांना विळखा! ६0 पेक्षा अधिक वयाच्या मृतांचे प्रमाण तब्बल ६१ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 09:59 PM2020-08-11T21:59:43+5:302020-08-11T22:00:05+5:30
दोनापावल येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीस्टेडियमवरील कोविड निगा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी खास वॉर्ड उघडण्यात आला आहे.
पणजी : गोव्यात कोविड पॉझिटिव्हने मृत्यू होण्याचे प्रमाण ६0 पेक्षा अधिक वयोगटात जास्त आहे. आतापर्यंत बळी गेलेल्यांच्या आकडेवारीत असे स्पष्ट झाले आहे की, राज्यात मृतांमध्ये ६0 पेक्षा अधिक वय असलेल्यांचे प्रमाण ६१ टक्के आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अधिक दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरले आहे.
दोनापावल येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीस्टेडियमवरील कोविड निगा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी खास वॉर्ड उघडण्यात आला आहे. २४ तास डॉक्टर, हाऊसकिपिंगची सोय येथे करण्यात आलेली आहे, असे आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. शनिवारी खोर्ली, म्हापसा येथील ७४ वर्षीय वृद्धाचे निधन झाले. याच दिवशी करासवाडा म्हापसा येथील ४0 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
शुक्रवारी ७ रोजी तिघांचे कोविडने निधन झाले. हे तिघेही ६0 पेक्षा जास्त वयाचे होते. वास्को येथील ७८ वर्षीय वृद्धाचे मडगावच्या ईएसआय इस्पितळात निधन झाले. म्हापसा येथील ६२ वर्षीय तसेच सडा, वास्को येथील ८0 वर्षीय वृद्धाचा याच दिवशी मृत्यू झाला. कुडणे, डिचोली येथील ३0 वर्षीय युवकाचा शुक्रवारी बळी गेला.
आजच्या घडीला एकूण २३३२ सक्रीय कोविड पॉझिटिव्ह रुग्ण राज्यात आहेत. तर ५८0२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. खात्याच्या बुलेटिनमध्ये मृतांची आकडेवारी तपासली असता ४0 आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मृतांचे प्रमाण ३४ टक्के, ४0 पेक्षा कमी वय असलेल्या मृतांचे प्रमाण ५ टक्के एवढे असल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत ६0 पेक्षा अधिक वयाचे ४४ जण कोविडने दगावले. ४0 पेक्षा अधिक वयाचे २३ तर ४0 पेक्षा कमी वयाचे ५ जण दगावले.
सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे १४ वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी कोविडची बळी ठरली. आल्तिनो येथे २९ वर्षे वयाच्या आणि कुडणे, डिचोली येथील ३0 वर्षे वयाच्या युवकाचे निधन झाले. कुडणे येथील युवकाचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. या युवकाची संसाराची स्वप्ने धुळीस मिळाली.
असा आहे मृतांचा आकडा
६0 पेक्षा अधिक वय : ४४
४0 पेक्षा अधिक वय : २३
४0 पेक्षा कमी वय : 0५