CoronaVirus News : गोव्याला महाराष्ट्रापासून कोरोनाचा धोका - मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 02:05 PM2020-05-26T14:05:40+5:302020-05-26T14:05:57+5:30
CoronaVirus News in Goa : दाबोळी विमानतळावर येणा-या वाहतुकीला चांगली वाहतूक सुविधा मिळावी यासाठी ४२ कोटी रुपये खर्च करून रस्त्याच्या दोन्ही बाजूत बांधण्यात आलेल्या ‘ग्रॅड सेपरेटर’ पूलांचे मंगळवारी (दि.२६) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
वास्को: गोव्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी ९० टक्के महाराष्ट्रातून आलेले असल्याचे स्पष्ट झालेले असून गोव्याला महाराष्ट्राकडून जास्त कोरोनाची भीती असल्याचे जाणवते. गोवा सरकारने केंद्रीय रेल्वे तसेच उड्डाण मंत्रालयाला गोव्याला महाराष्ट्राकडून कोरोनाची जास्त भीती असल्याची माहिती दिलेली असून गोव्यात येण्यासाठी लागणाया स्टॅडर्ड ऑपरेटिंग प्रक्रियेत (एसओपी) महाराष्ट्रासाठी काही नियमात बदल करण्यात येणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
दाबोळी विमानतळावर येणा-या वाहतुकीला चांगली वाहतूक सुविधा मिळावी यासाठी ४२ कोटी रुपये खर्च करून रस्त्याच्या दोन्ही बाजूत बांधण्यात आलेल्या ‘ग्रॅड सेपरेटर’ पूलांचे मंगळवारी (दि.२६) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकारांना माहीती देताना गोव्यात सध्या ४८ कोरोना रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती त्यांनी दिली.
यापैकी बहुतेक रुग्णांवर येत्या दोन दिवसात पहिली व दुसरी चाचणी करण्यात येणार असून जास्तीत-जास्त रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह येणार असल्याचा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. गोवा कोरोना विषाणूपासून सुरक्षित असून कोरोनाचा धोका गोव्याला अजून नाही. गोव्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी सर्वजण बाहेरील राज्यातून रस्ता, रेल्वे अथवा विमान वाहतूक मार्गे आलेले असल्याचे स्पष्ट झालेले असून गोव्यात वास्तव्य करणा-यांना याची बाधा झालेली नसल्याचे स्पष्ट झालेले आहे.
कोरोनाचा फैलाव गोव्यात अजून मुळीच झालेला नसून यामुळे गोवा कोरोना विषाणूपासून सुरक्षित असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. बाहेरून आल्यानंतर कोरोनाची बाधा झालेले आढळलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के महाराष्ट्रातून आलेले असल्याचे दिसून आले आहे. तसेच, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने गोव्याला जर कोरोनाबाबत कोणाचा धोका आहे तर तो महाराष्ट्राचा असल्याची भीती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. यामुळे महाराष्ट्रातून गोव्यात येण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रक्रीयेत (नियम) लवकरच काही बदल होणार असल्याची शक्यता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
गोव्याला महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांकडून कोरोना विषाणूचा धोका निर्माण होऊ शकतो याची माहिती गोवा सरकारने रेल्वे तसेच उड्डाण मंत्रालयाला दिलेली असून गोव्याच्या हितासाठी लवकरच त्यांच्याकडून उचित पावले उचलण्यात येणार असल्याचा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.