CoronaVirus News: कोविड इस्पितळात पहिल्या बाळाचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 03:16 AM2020-06-14T03:16:52+5:302020-06-14T03:17:16+5:30
गोव्यातील कुटुंबाला दिलासा; गोमेकॉ डॉक्टरांकडून यशस्वी शक्रिया
पणजी : कोविड संसर्गित व्यक्तीवर उपचार करणे, हे उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठीही जोखमीचे असते, अशा परिस्थितीतही एका संसर्गित गर्भवती महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचे काम मडगाव येथील कोविड इस्पितळात करण्यात आले. कोविड इस्पितळात पहिले बाळ जन्माला आले.
मांगोरहिल येथील ३३ वर्षांची महिला ही कोविड संसर्गित आढळली होती. तिला कोणतीही लक्षणे नसल्यामुळे तिला कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले नव्हते. परंतु ती गर्भवती होती आणि शुक्रवारी संध्याकाळी तिला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले. लवकरच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर अंकिता सिनाई बोरकर व त्यांच्या पथकाने तिच्यावर यशस्वीरीत्या प्रसूती शस्त्रक्रिया केली.
ही गर्भवती महिला कोविड संसर्गित आढळल्यामुळे त्या महिलेवर आणि तिच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. कारण आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गर्भवती महिलांना कोविडचा संसर्ग हा चिंताजनक ठरू शकतो. परंतु प्रसूतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे तिला व तिच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. महिला व तिच्या बाळाची (मुलगी) प्रकृती स्थिर असल्याची माहिती इस्पितळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. बाळाची प्रकृती ठीक असली तरी त्याचीही कोविड चाचणी केली जाणार असल्याचे इस्पितळातील सूत्रांकडून सांगण्यात आले. बाळ अजून मातेकडे सोपविण्यात आलेले नाही. बाळाला कोविड संसर्ग झालेला नसल्यास तिच्याकडे ठेवले जाणार नाही. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी डॉ. अंकिता आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. गोव्यातील ही अशा प्रकारची पहिली घटना असून, महाराष्ट्रात अशा गर्भवती महिलेवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.
मॉक ड्रिल : महामारीच्या या काळात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी वैद्यकीय पथकाने ठेवलेली असते. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून तसा सरावही होतो. त्याला ‘मॉक ड्रिल’ असे म्हणतात. संसर्गित गर्भवती महिलेवर प्रसूती शस्त्रक्रिया करावी लागल्यास ती कशी करावी याचे मॉक ड्रिलही करण्यात आले होते, असे आरोग्य खात्याच्या उपसंचालक डॉ. आयरा आल्मेदा यांनी याविषयी माध्यमांना सांगितले.