CoronaVirus News: गोव्यात मास्क न वापरल्याबद्दल आतापर्यंत ११ हजारजणांना ठोठावला दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 03:57 PM2020-05-17T15:57:51+5:302020-05-17T16:07:37+5:30
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल ६,५00 जणांवर कारवाई
पणजी : ‘कारोना’च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने तोंडावर मास्कचा वापर करणे बंधनकारक असतानाही या गोष्टीचे उल्लंघन केल्याबद्दल गोवा पोलिसांनी आतापर्यंत ११,000 व्यक्तींना दंड ठोठावला तर ६,५00 जणांवर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल कारवाई करण्यात आली.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्य सरकारने २७ एप्रिल रोजी आदेश काढून सर्वांना सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे तरीही काहीजण मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. लॉकडाऊनमुळे संचारबंदीही लागू आहे. २३ मार्चपासून आजपावेतो लॉकडाऊनच्या उल्लंघनाची तब्बल ४0 हजार प्रकरणे नोंद झाली. यात एकूण १,३३५ जणांना अटक करण्यात आली. दक्षिण गोव्यात ७८१ तर उत्तर गोव्यात ५५४ जणांना अटक झाली. ७३८ प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात दुकाने उघडणे, संचारबंदी असतानाही कारण नसताना बाहेर फिरणे आदी गोष्टींबद्दल गुन्हे नोंदविण्यात आले.
वास्कोच्या अंटार्क्टिका सेंटरमध्ये काम करणारे एनआयओच्या एका निवृत्त ज्येष्ठ शास्रज्ञ म्हणाले की, ‘कामानिमित्त बांबोळीहून मी रोज वास्कोला प्रवास करतो परंतु ५0 टक्क्यांहून अधिक वाहनधारक असे आढळतात की ते तोंडावर मास्कचा वापर करत नाहीत. मास्क गळ्यात अडकवलेला असतो, परंतु तोंडावर बांधला जात नाही. झुवारी पुलावर पोलिस असतात परंतु या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. वास्कोच्या बाजारपेठेतही काही लोक मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून आले. अशाने ‘कोरोना’चा फैलाव होण्यास वेळ लागणार नाही. प्रशासनाने तसेच पोलिसांनी या उल्लंघनांकडे गांभीर्याने पाहण्याची व कारवाई करण्याची गरज आहे.