CoronaVirus News in Goa : मुंबईतील ‘कोरोना’ हॉटस्पॉटमधून येणाऱ्या प्रवाशांकडून धोका; गोवेकरांमध्ये धास्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 12:45 PM2020-05-27T12:45:55+5:302020-05-27T12:46:21+5:30
CoronaVirus News in Marathi and Live updates : केवळ मुंबईतच आजच्या घडीला तब्बल २६४३ ‘कोरोना’ हॉटस्पॉट आहेत. फोर्ट, अंधेरी, विलेपार्ले, सहार गांव, सांताक्रुझ, गिरगाव, माहीम भागात अनेक मूळ गोमंतकीय आहेत.
पणजी : मुंबई, दिल्लीतील ‘कोरोना’ हॉटस्पॉटमधून गोव्यात येणा-या प्रवाशांकडून गोव्यात ‘कोरोना’ फैलावाचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोव्यात आल्यानंतर संबंधित प्रवासी मुंबई किंवा दिल्लीच्या कोणत्या भागातून आला, याची माहिती घेतली जाते. परंतु तोपर्यंत कोण प्रवासी कुठून येणार आहे, याची कोणतीही कल्पना प्रशासनाला नसते, असे दिसून आले आहे. दुसरीकडे आतापर्यंत गोव्यात कोरोना पॉझिटिव्ह सापडलेले रुग्ण हे अधिकतर महाराष्ट्रातूनच आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून येणा-या प्रवाशांच्या बाबतीत शिष्टचार प्रक्रिया (एसओपी) अधिक कडक करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.
केवळ मुंबईतच आजच्या घडीला तब्बल २६४३ ‘कोरोना’ हॉटस्पॉट आहेत. फोर्ट, अंधेरी, विलेपार्ले, सहार गांव, सांताक्रुझ, गिरगाव, माहीम भागात अनेक मूळ गोमंतकीय आहेत. मुंबईतील या भागांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने हे भाग ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. फोर्ट भागात सुखवस्तू गोवेकर कुटुंबे राहतात जी बड्या कंपन्या किंवा सरकारी खात्यांमध्ये मोठ्या हुद्यांवर अनेक वर्षे काम करतात. सहार गांवमध्ये तर संपूर्ण वसाहतच गोवेकर ख्रिस्तींची आहे. सांताक्रुझ, माहीममध्येही गोवेकरांचे प्रमाण लक्षणीय आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही अधिकतम कोरोना पॉझिटिव्ह हे महाराष्ट्रातून येणारे प्रवासीच असल्याचे मान्य केले आहे. आणि त्या अनुषंगाने शिष्टाचार प्रक्रियेतही काही कडक तरतुदी कराव्या लागणार असल्याचे म्हटले आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे बोलणी चालू आहेत. मान्यता मिळाल्यावर हे पाऊल उचलले जाईल, असे त्यांनी सांगितले.
दिल्लीतही ८७ ‘कोरोना’ हॉटस्पॉट आहेत. अनेक गोवेकर दिल्लीतही राहतात. संगम विहार, निझामुद्दिन (पश्चिम), व्दारका, कैलाश हिल्स, मोतिबाग, अशोकनगर, शास्री पार्क हे विभाग दिल्लीत ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून जाहीर झालेले आहेत. विमान, रेलगाड्या आणि रस्तामार्गे हजारो प्रवाशी पुढील काही दिवसात राज्यात दाखल होणार आहेत. आरोग्य खात्यातील साथरोग विभागाचे प्रमुख तथा ‘कोरोना’चा विषय हाताळणारे डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘विमान, रेल्वे अथवा रस्तामार्गे आलेल्या प्रत्येकाची गोव्यात पोहोचल्यानंतर तो कुठल्या भागातून आलेला आहे याची माहिती घेतली जाते. तो जेथून आला तो पत्ता नोंद करुन घेतला जातो. प्रवाशांना आम्ही तीन पर्याय दिले आहेत.
‘कोविड १९’ची निगेटिव्ह चाचणी आलेला दाखला घेऊन येणा-यांना राज्यात थेट प्रवेश दिला जाईल. त्यांना चाचणी करुन घ्यावी लागणार नाही. मात्र हा दाखला ४८ तास आधी आयसीएमआर अधिमान्यताप्राप्त प्रयोगशाळेने दिलेला असायला हवा अशी अट आहे. इतरांनी २000 रुपये भरुन कोविड-१९ चाचणी करुन घ्यावी लागेल. घशातील द्राव चाचणीसाठी काढल्यानंतर त्यांच्याकडून लेखी घेऊन घरी पाठवले जाईल. परंतु अहवाल येईपर्यंत त्यांना होम क्वारंटाइन रहावे लागेल आणि ज्यांना २000 रुपये भरुन चाचणी करावयाची नाही त्यांना हातावर शिक्का घेऊन १४ दिवस होम क्वारंटाइन रहावे लागेल.
मुंबई, दिल्ली किंवा देशातील अन्य कुठल्याही भागातील हॉटस्पॉटमधून जरी एखादा प्रवासी आला तरी त्याला वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावेच लागेल त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही.