CoronaVirus News in Goa : पर्यटकांनो, तूर्त गोव्यात येऊच नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 02:45 PM2020-05-25T14:45:10+5:302020-05-25T15:51:21+5:30
‘कोरोना’चे संकट दूर झाल्यानंतरच पाहुण्यांना पायघड्या घालू.’
पणजी : अतिथी देवो भव: म्हणून आजवर देश-विदेशी पाहुण्यांना पायघड्या घालणा-या गोवा सरकारने ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर तूर्त गोव्यात येऊच नका असे कळकळीचे आवाहन पर्यटकांना केले आहे. जिवाचा गोवा करण्यासाठी येऊ इच्छिणा-यांचे मनसुबे यामुळे धुळीस मिळाले आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्टपणे बजावले आहे की, सरकार हॉटेले मुळीच उघडू देणार नाही. त्यामुळे गोव्यात येऊन हॉटेलात उतरणार, मौजमजा करणार ही स्वप्ने कोणी बाळगू नयेत. ‘कोरोना’चे संकट दूर झाल्यानंतरच पाहुण्यांना पायघड्या घालू.’ विमाने, रेलगाड्या, रस्तामार्गे आता हजारो प्रवाशी गोव्यात येतील.
मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही पर्यटकांना बोलावलेले नाही. त्यामुळे ‘कोविड पर्यटन’ अशी जी टीका विरोधक करीत आहेत ती करु नये. गोव्यात ज्यांचे घर आहे किंवा ज्यांच्याकडे गोव्यातील घराचा पत्ता आहे किंवा नातेवाईकांनी बोलावले आहे, अशा व्यक्तींनाच खातरजमा करुन परवानगी दिलेली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यात अनेकांचे सेकंड होम आहे. यात सेलब्रिटींपासून आयएएस, आयपीएस अधिका-यांचा समावेश आहे. गोव्यात सेकंड होम आहे त्यांना परवानगी दिलेली आहे. अनेकांना त्यांच्या नातेवाईकांनीच बोलावले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रवाशांसमोर तीन पर्याय
गोव्यात येणा-या प्रवाशांसमोर तीन पर्याय ठेवण्यात आलेले आहे. एकतर संबंधिताने ‘कोविड १९’ची निगेटिव्ह चाचणी आलेला दाखला घेऊन येऊन यावा, जो येण्याच्या आधी ४८ तासांच्या कालावधीत आयसीएमआर या अधिमान्यताप्राप्त प्रयोगशाळेने दिलेला असावा. इतरांनी २000 रुपये भरुन कोविड-१९ चाचणी करुन घ्यावी लागेल. घशातील द्राव चाचणीसाठी काढल्यानंतर त्यांच्याकडून लेखी घेऊन घरी पाठवले जाईल परंतु अहवाल येईपर्यंत त्यांना होम क्वारंटाइन रहावे लागेल आणि ज्यांना २000 रुपये भरुन चाचणी करावयाची नाही त्यांना हातावर शिक्का घेऊन १४ दिवस होम क्वारंटाइन रहावे लागेल. लेखी दिल्यानंतरही घरी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणा-या किंवा घराबाहेर फिरणा-यांना पकडून आणले जाईल आणि रोज २000 रुपये शुल्क भरुन अशा व्यक्तींना १0 दिवस सरकारी क्वारंटाइन केंद्रात रहावे लागेल.
यांची करडी नजर राहणार
होम क्वारंटाइनसाठी घरी पाठवल्या जाणा-या प्रत्येकावर त्या भागातील आरोग्य अधिकार, पोलिस निरीक्षक, पंचायतीचा पंच किंवा महापालिका क्षेत्रात असल्यास नगरसेवक यांची करडी नजर राहील. अशा व्यक्तिंनी कुटुंबातील व्यक्तींशीही मिसळू नये. होम क्वारंटाइनसाठी पाठवल्यानंतर त्या घरावर स्टिकर लावला जाईल. लोकांनी अशा घरातील व्यक्तींना वाळीत टाकू नये. तसे आढळून आल्यास किंवा विरोध केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा गावातील लोकांनाही मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. मार्गदर्शक तत्त्चें धुडकावून जर कोणी घराबाहेर पडत असेल तर त्याच्यावर महामारी कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
गोव्यात दरवर्षी सुमारे ८0 लाख पर्यटक भेट देत असतात. यात ७ ते ८ लाख विदेशी असतात. रशियन पर्यटक सर्वात जास्त येतात तर त्या पाठोपाठ ब्रिटिश् पर्यटकांचा क्रमांक लागतो. सुमारे ७0 लाख देशी पर्यटक भेट देत असतात. मे, जूनमध्ये एरव्ही गुजरात, दिल्लीहून पर्यटक येत असतात परंतु यंदा लॉकडाऊनमुळे देशी पाहुणे येऊ शकलेले नाहीत.