CoronaVirus News: गोव्यात हॉटेल्स खुली पण पर्यटक नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 06:32 PM2020-07-04T18:32:59+5:302020-07-04T18:33:20+5:30
सुमारे दीडशे हॉटेलनाच पर्यटन खात्याने परवानगी दिली होती. त्यापैकी काही मोठी हॉटेल्स खुली झाली.
पणजी : राज्यातील अवघीच हॉटेल्स खुली झाली पण राज्यात पर्यटक काही येत नाहीत. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांचा थोडा अपेक्षाभंगच झालेला आहे. सरकार पर्यटन सुरू करू पाहत असले तरी, जोर्पयत पर्यटक येणार नाहीत तोर्पयत हॉटेल्स खुली करून देखील फारसा अर्थ नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सुमारे दीडशे हॉटेलनाच पर्यटन खात्याने परवानगी दिली होती. त्यापैकी काही मोठी हॉटेल्स खुली झाली. मात्र पर्यटकांचा प्रतिसाद नाही. पणजीतील एक-दोन हॉटेल्स तसेच कळंगुट, कांदोळी, सिकेरीच्या पट्टय़ातील काही हॉटेल्स खुली झाली. तीन महिने हॉटेल्स बंद होती. लॉक डावनच्या काळात काही हॉटेलांनी नूतनीकरणाचे काम सुरू केले. अजुनही ते काम सुरू आहे, त्यामुळे आम्ही अगोदर आमची कामे पूर्ण करू व मगच कधी तरी हॉटेल खुले करू, असे काही व्यवसायिक सांगतात. बहुतेक हॉटेलांकडे मनुष्यबळ कमी आहे.
अनेक कामगार आपल्या मूळगावी गेलेले आहेत. ते परतण्यासही थोडा वेळ लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे पर्यटकच अजून येत नसल्याने हॉटेलचा धंदा तूर्त तेजीत चालणार नाही, पुढील महिन्याभरात जर पर्यटक आले तर हॉटेलमधील रेस्टॉरंट्सदेखील सुरू करता येतील, असे काही व्यवसायिकांनी सांगितले. सरकारने हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली हे चांगले केले पण हॉटेलमधील बार जोर्पयत सुरू करता येणार नाही, तोर्पयत व्यवहार पूर्णपणो सुरू होणार नाही असेही हॉटेल मालक सांगतात.
विदेशी पर्यटक गोव्यात येऊ शकणार नाहीच. कारण आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झालेली नाही. देशी पर्यटक येतील पण गोव्यातही कोविडग्रस्तांची संख्या वाढत असल्याने पर्यटकांचे हॉटेलमध्ये स्वागत करताना हॉटेल मालकांना खूप काळजी घ्यावी लागेल. काही गेस्ट हाऊसमध्ये दीर्घकालीन व्हीसाचे विदेशी पर्यटक राहतात. ते लॉक डाऊनपूर्वीच गोव्यात आले होते. काही अतीश्रीमंत पर्यटक गोवा सुरक्षित असल्याने गोव्यात येतील व मोठय़ा हॉटेलमधील राहतील. मध्यम दर्जाची हॉटेल्सना सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल.