CoronaVirus News : मोतीडोंगर मांगोर हिलच्या दिशेने? 15 जण पॉझिटिव्ह, कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:18 PM2020-06-29T22:18:00+5:302020-06-29T22:18:50+5:30
मांगोर हिलची पुनरावृत्ती मडगावात तर होणार नाही ना या भीतीने मडगावकराना ग्रासले आहे.
मडगाव: मडगावच्या मोती डोंगरावर कोरोनाच्या रुग्णांची संख्या सोमवारी सकाळपर्यंत 15 वर पोहोचल्याने संपूर्ण मडगाव भयभीत झाले असून ही झोपडपट्टी त्वरित कंटेन्मेंट झोन जाहीर करा अशी मागणी वाढू लागली आहे. मडगावातील नगरपालिकेच्या कामगारांसह बहुतेक कामगार याच वस्तीत राहत असल्याने ही लोकांमधली भीती अधिकच वाढली आहे. मांगोर हिलची पुनरावृत्ती मडगावात तर होणार नाही ना या भीतीने मडगावकराना ग्रासले आहे.
शनिवारी या वस्तीत एक 75 वर्षीय वृद्ध पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर रविवारी त्याच्याच घरातील आणखी चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यानंतर या भागातील लोकांच्या मोठय़ा प्रमाणात चाचण्या घेतल्या असता सोमवारी या व्यक्तीच्या शेजारी राहणारे आणखी 8 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात त्या व्यक्तीच्या शेजारच्या घरातील 6 व्यक्तींचा समावेश होता.
या झोपडपट्टीत अगदी एकमेकांना लागून घरे असल्यामुळे या वस्तीत हे संक्रमण वेगाने पसरू शकते. मडगावच्या बहुतेक घरातील कामवाल्या या वस्तीतल्या आहेत. त्याशिवाय दुकाने, इतर व्यवसायातील कामगारही याच वस्तीत राहतात. मडगावात घरोन्घर जाऊन कचरा उचलणारे पालिकेचे कामगारही बहुतेक याच वस्तीत राहत असल्याने वेळीच आळा घातला नाही तर हे संक्रमण मडगावात इतर ठिकाणीही पसरू शकते ही भीती लोकांमध्ये त्यामुळेच पसरली आहे. सध्या या झोपडपट्टीकडे जाणा-या तिन्ही वाटा पोलिसांचा बंदोबस्त ठेवून बंद करण्यात आल्या असून या वस्तीतल्या लोकांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.
अन्यथा मांगोर हिल सारखी स्थिती
मोती डोंगरावरील स्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरित पाऊले उचलून ही संपूर्ण झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्याची गरज मोती डोंगराच्या पायथ्याशी राहणारे भाई नायक यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, वास्को प्रमाणोच येथेही कामगार वस्ती आहे. पालिकेत या वस्तीतील कित्येकजण सफाई कामगार म्हणून काम करतात. वास्को येथील नगरसेवकांचा या कामगारांशी संपर्क आल्याने नगरसेवक बाधित झाले आहेत त्यामुळे मडगावात उपाय घेतले नाहीत तर जे वास्कोत घडले तेच मडगावातही घडू शकते असे ते म्हणाले. दरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार दिगंबर कामत यांना लक्ष्य केले असून त्यांच्या दबावामुळेच प्रशासन हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करत नाही असा आरोप चंदन नायक यांनी केला आहे.
कंटेन्मेंट झोन रोखणारा मी कोण?
भाजपाने दिगंबर कामत यांना लक्ष्य केले असल्याच्या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोन करण्यापासून प्रशासनाला रोखणारा मी कोण असा सवाल कामत यांनी केला आहे. ते म्हणाले, असे निर्णय आमदार नव्हे तर जिल्हा प्रशासन घेते. मी सरकारातही नाही मग माङयावर आरोप का असा सवाल त्यांनी केला. मोती डोंगरावरील संक्रमण इतर भागात पोहोचू नये यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. या वस्तीच्या तिन्ही वाटा बंद केल्या आहेत. रविवारी स्थानिकाबरोबर बैठक घेऊन कुणी घरातून बाहेर पडू नये असे त्यांना सांगितले आहे. चाचण्याही सुरू केल्या आहेत असे त्यांनी सांगितले.