CoronaVirus: अंड्यांवर बंदी नाही, स्थानिक चिकन सुरक्षित: मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:17 PM2020-04-04T22:17:56+5:302020-04-04T22:20:11+5:30
माशांची घरोघरी जाऊन विक्री शक्य
पणजी : राज्यात अंड्यांची आयात करण्यावर आता सरकारने बंदी लागू केली नाही. पोल्ट्री फार्मकडील सुरक्षा प्रमाणपत्रच्या आधारे गोव्यात अंडी आणता येतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी येथे सांगितले. गोव्यात ज्या कोंबड्या सध्या उपलब्ध आहेत, ते स्थानिक चिकन खाण्यास काहीच हरकत नाही. परप्रांतांमधून मात्र कोंबड्या सध्या आणू नयेत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सावंत यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. काही विरोधक चिकन व अंडय़ांच्या विषयावरून राजकारण करू पाहत आहेत. निदान आरोग्याच्या विषयावरून तरी राजकारण करू नये. केरळ व कर्नाटकमध्ये बर्ड फ्लू असल्याचे गेल्या 16 मार्च रोजी केंद्र सरकारने दाखवून दिले होते. तसे पत्र उपलब्ध आहे. त्यामुळेच गोमंतकीयांच्या आरोग्याच्या हिताच्यादृष्टीने आम्ही परराज्यांतून चिकन गोव्यात येण्यावर बंदी लागू केली होती. गोव्यात जे चिकन सध्या उपलब्ध आहे, ते खाण्यावर बंदी नाही. पशूसंवर्धन खाते सध्या स्थितीचा आढावा घेत आहे. परराज्यांतील चिकनच्या आयातीविषयी पुढील निर्णय आणखी दोन दिवसांनी घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
घरोघरी जाऊन मासे विक्री शक्य
राज्यातील ट्रॉलरकडे सध्या जो माशांचा साठा आहे, त्याची विक्री करता येईल. पण मासळीच्या बाजारात विक्री करता येणार नाही. मासळी बाजार खुले करता येणार नाहीत. घरोघरी जाऊन पारंपरिक पद्धतीने जशी मासळी विक्री केली जाते, त्या पद्धतीने सध्याचा साठा विकता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
..तर घर मालकांवर कारवाई
सध्या पोलिसांचा सायबर क्राईम विभाग सक्रिय आहे. कुणी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियावर टाकल्यास पोलिस कारवाई करत आहेत. लॉक डाऊनच्या काळापुरती उद्योगांनी कामगारांच्या वेतनात कपात करू नये. सरकार प्रसंगी उद्योगांविरुद्ध कारवाई करील. तसेच भाडेकरूंना घर मालकांनी एक महिन्याचे भाडे माफ करावे. एका महिन्याचे भाडे दिले नाही म्हणून मजुर, विद्यार्थी किंवा इतर कुणाला घर मालकाने घराबाहेर काढू नये. अशा पद्धतीने कुणी वागल्यास कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.