गोव्यात 6 दिवसात कोविड संक्रमितांची संख्या चौपट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 08:51 PM2020-06-06T20:51:30+5:302020-06-06T20:53:35+5:30
रुग्णालयावर ताण; सुविधा अपुऱ्या पडण्याची भीती
- वासुदेव पागी
पणजीः गोव्यात मांगोरहील - वास्कोतील कोविड रुग्णसंख्येच्या उद्रेकानंतर एकाचवेळी राज्यातील 6 भागातून कोविड रुग्णांचा मडगावच्या कोविड इस्पितळात ओघ सुरू झाला असून केवळ 6 दिवसात संक्रमितांची संख्या चार पटीने वाढली आहे. यामुळे कोविड इस्पितळावरील ताण वाढत चालला असून उपलब्ध साधन सुविधा अपुऱ्या ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. हा ओघ असाच चालू राहिल्यास 200 रुग्णांची व्यवस्था असलेल्या इस्पितळावर क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण हाताळण्याची वेळ येणार आहे.
अनिश्चिततेच्या या काळात एक मोठी दिलासादायक गोष्ट म्हणजे गोव्याच्या कोविड इस्पितळाची नेत्रदीपक कामगिरी. महामारी सुरू झाल्यापासून आतापयर्यंत आढळलेल्या सर्वच कोविड संसर्गितांवर या इस्पितळात उपचार करण्यात आले आहेत आणि रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकाही संसर्गित या इस्पितळात प्राणास मुकलेला नाही. त्यामुळे ज्याचा सार्थ अभिमान धरावा असे हे मडगावचे कोविड इस्पितळ ठरले आहे.
जोपर्यंत इस्पितळात दाखल रुग्णांची संख्या मर्यादीत राहील तोपर्यंत त्यांच्याकडे पुरेसे लक्ष देणे तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शक्य होईल, परंतु संसर्गीत रुग्णांची संख्या ही प्रमाणा बाहेर जाईल तेव्हा त्याचा परिणाम उपचारांवरही होणे स्वाभाविक आहे. मागील आठ दिवसाची संसर्गितांची आकडेवारी पाहाता 200 खाटांची व्यवस्था ही कमी पडण्याची पूर्ण शक्यता असल्याची माहिती कोविड इस्पितळातील एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संसर्गितांच्या संख्येत आढळून आलेली वाढ ही अधिक चाचण्यांचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. परंतु वाढ झपाट्याने होताना दिसत आहे हे वास्तव आहे.
इस्पितळात चौपट एकूण अडीचपट
आरोग्य खात्याच्या अधिकृत माहितीनुसार 31 मे रोजी एकूण संसर्गितांची संख्या 71 इतकी होती तर बरे होवून घरी गेल्यानंतर प्रत्यक्ष कोविड इस्पितळात दाखल असलेले 27 रुग्ण होते. नंतरच्या 6 दिवसात एकूण संसर्गित झाले 196 आणि प्रत्यक्ष दाखल असलेले झाले 131. म्हणजेच केवळ सहा दिवसात कोविड इस्पितळात दाखल असलेल्या संसर्गीत रुग्णात चौपटीने तर एकूण रुग्णसंख्येत अडीच पटीने वाढ झाली आहे.
6 भागातून संक्रमितांचा ओघ
या आठवड्यापासून कोविड इस्मांपितळात येणाऱ्या रुग्णांचा मांगोर हील वास्को परिसर हा मोठा स्रोत राहिला आहे. त्यानंतर मालभाट - मडगाव, सांगे, गुळेली, दोनापावला या भागातून संक्रमित येऊ लागले आहेत. शिवाय सर्व चेक नाके आणि रेल्वे स्थानकांवरून येणाऱ्या संक्रमितांची संख्याही फार कमी झालेली नाही. कुंकळ्ये - म्हार्दोळ भागात आढळलेला संशयित हा नव्या चिंतेची बाब ठरला आहे.
ग्रामीण भागातही शिरकाव
महामारीपासून रक्षणासाठी खेडेगावे ही सुरक्षित आहेत अशी एक धारणा होती. आता खेडी ही सुरक्षित राहिली नसल्याचे संकेत मिळत आहेत. सांगे सारख्या भागात आणि म्हार्दोळ कुंकळ्ये सारख्या भागात संसर्गित आढळणे धक्कादायक आहे.