CoronaVirus : '...अन्यथा आमच्या शवपेट्या आणायची वेळ तुमच्यावर येईल'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 04:46 PM2020-04-21T16:46:14+5:302020-04-21T16:46:53+5:30
CoronaVirus : जहाजावर एकूण 190 भारतीय खलाशी असून त्यापैकी 65 गोमंतकीय आहेत.
मडगाव: गेल्या 40 दिवसांपासून भारतीय समुद्रात असलेले मारेला डिस्कवरी हे जहाज उद्या( दि.२२) पुन्हा युरोपला जाण्यासाठी निघणार आहे. त्यामुळे या जहाजावरील गोमंतकीय खलाशांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. आम्हाला खाली उतरविण्याचा निर्णय एका दिवसात घ्या, अन्यथा आमच्या शवपेट्या घरी आणण्याची वेळ तुमच्यावर येईल, असा इशारा या खलाशांनी दिला आहे.
या जहाजावर एकूण 190 भारतीय खलाशी असून त्यापैकी 65 गोमंतकीय आहेत. 40 दिवसांपूर्वी हे जहाज कोची बंदरात आले होते, त्यानंतर ते मुंबईला हलविण्यात आले. 40 दिवस उलटूनही भारतीय खलाशांना खाली उतरविण्या संदर्भात कसलाही निर्णय न झाल्याने आता ते परत युरोपात नेण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
या निर्णयामुळे धीर खचलेल्या गोमंतकीय खलाशानी एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून आपली व्यथा मांडली आहे. या व्हिडिओत ते म्हणतात, अजून आमची तब्येत उत्तम आहे. पण आम्हाला कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या युरोपात घेऊन गेल्यास स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरित एका दिवसात काय तो निर्णय घ्या, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रश्नात केंद्र सरकारने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली असून त्यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे यासंदर्भात चर्चा केली आहे.
दुसरीकडे, जर या खलाशांना मुंबई बंदरावर उतरवता येत नसेल तर त्यांना मुंबईत असलेल्या कर्णिका या जहाजावर हलवावे. पण त्यांना कुठल्याही परिस्थिती युरोपात परत पाठवू नये, अशी मागणी सीफेरर असोसिएशन संघटनेने केली आहे. या खलाशांना मुंबईतच उतरवून त्यांना तिथेच क्वारंटाइन करून ठेवावे, अशी मागणी काही जणांनी केली आहे, तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या मुंबईत त्यांना ठेवण्यापेक्षा त्यांना आधी गोव्यात आणावे आणि नंतर त्यांना गोव्यातच विलगीकरण कक्षात ठेवावे, अशी मागणीही होत आहे.