CoronaVirus : खाकीतील माणुसकी! स्वत:च्या पगारातून ७० कुटुंबीयांना रेशन पुरविणारे पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 10:05 PM2020-04-18T22:05:54+5:302020-04-18T22:06:19+5:30
CoronaVirus : गोवा क्राइम ब्रँचच्या सहा पोलिसांनी स्वतःच्या पगारातून टॅक्सी चालक आणि मोटरसायकल पायलट यांच्यासह एकूण ७० कुटुंबांसाठी रेशन खरेदी केले.
पणजीः देशात आणि राज्यात कोणतीही आणीबाणीची परिस्थिती असो किंवा कोणताही प्रसंग. समोर ठामपणे उभे असतात, ते म्हणजे पोलीस. याच पोलिसांनी सध्याच्या परिस्थित खाकीतील माणुसकी दाखविली आहे. गोवा क्राइम ब्रँचच्या सहा पोलिसांनी स्वतःच्या पगारातून टॅक्सी चालक आणि मोटरसायकल पायलट यांच्यासह एकूण ७० कुटुंबांसाठी रेशन खरेदी केले.
क्राइम ब्रँचचे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी त्यांच्या इतर पाच सहकाऱ्यांच्या योगदानातून एक निश्चित अशी रक्कम जमविली. त्यात स्वतः निरीक्षक सावंत, हेड कन्स्टेबल दिनेश पिकुळकर, कॉन्स्टेल नवीन पालयेकर, कल्पेश शिरोडकर, किरण परब आणि संजय गांवकर यांनी आपल्या पगारातून पैसे जमा केले. जमा झालेल्या पैशातून तांदुळ व इतर कडधान्ये खरेदी केली. त्यानंतर 70 पिशव्या तयार केल्या आणि त्यामध्ये प्रत्येकी 10 किलो तांदुळ, 5 किलो पीठ, 1 किलो साखर, 1 किलो तुरडाळ मसाला पिकिटे आणि बिस्किटे असे साहित्य भरले. या भरलेल्या पिशव्या डिचोली, साखळी, वाळपई या ठिकाणच्या टॅक्सी चालक आणि मोटरसायकल पायलट यांच्यासह एकूण ७० कुटुंबीयांना दिल्या.
लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेले लोक म्हणजे टॅक्सी व्यावसायिक असल्यामुळे त्यांना मदतीची सर्वाधिक गरज असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा उपक्रम करावासा वाटला, असे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी सांगितले.