coronavirus : 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:52 PM2020-04-22T22:52:55+5:302020-04-22T22:53:35+5:30

सध्या मुंबईत अडकलेल्या 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

coronavirus: Preparations underway to bring 181 Gomantak sailors to Goa | coronavirus : 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू

coronavirus : 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू

Next

मडगाव - भारतीय बंदरावर असलेल्या जहाजातील भारतीय खलाशाना भूमीवर उतरण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी रात्री हिरवा कंदील दाखविल्यानंतर सध्या मुंबईत अडकलेल्या 181 गोमंतकीय खलाशाना गोव्यात आणण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आणखी तीन जहाजे भारतात येण्यासाठी उद्या गुरुवारी मियामीहून सुटणार अशी माहिती मिळाली आहे. 28 मे पर्यंत ही जहाजे मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे खलाशांच्या कुटुंबामध्येही खुशीचे वातावरण पसरले आहे.

सध्या मुंबईत कर्णिका या जहाजावर 93, मारेला या जहाजावर 65 तर आंग्रेया या जहाजावर 23 गोमंतकीय खलाशी  आहेत त्यांना समुद्र मार्गानेच गोव्यात आणावे असा प्रस्ताव सरकारपुढे ठेवण्यात आला होता मात्र बहुतेक त्यांना बस मार्गेच गोव्यात आणले जाणार आहे. प्रत्येक बशीत 20 जणांना बसविले जाईल अशी माहिती  मिळाली आहे.

या घडामोडीवर  विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी समाधान व्यक्त केले असून केलेल्या श्रमाची पावती मिळाली असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

या खलाशांना भूमीवर उतरता यावे यासाठी विषेश परिश्रम केलेले गोवन सीमेन अससोसिएशन या संघटनेचे डिक्सन वाझ याना विचारले असता,  आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अजूनही त्या खलाशाना भूमीवर उतरविण्यात आलेले नाही . मात्र मुंबईत खोल समुद्रात असलेले मारेला हे जहाज  बंदराच्या जवळ आले असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. बहुतेक गुरुवारी त्यांना खाली उतरविण्यात येईल.

मुंबईत नांगर घालून थांबलेले मारेला हे जहाज आज बुधवारी युरोपला जाण्यासाठी निघणार अशी माहिती मिळाल्यानंतर त्या जहाजावरील खलाशांच्या तोंडचे पाणी पळाले होते.  त्यांनी आपला एक व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित करताना एका दिवसात काही तरी हालचाली करा आणि आम्हाला सोडवा अशी विनंती केली होती. आमची बोट युरोपला गेल्यास आमच्या शवपेट्या आणण्याचे तुमच्या नशिबी येईल असा इशाराही दिला होता. त्यानंतर सरकारवर चारी बाजूनी दडपण येऊन दिल्लीत लगोलग सूत्रे हलून मंगळवारी रात्रीपर्यंत केंद्राचा आदेश जारी झाला होता.

यासंदर्भात बोलताना कॅ. वेंझी व्हिएगास म्हणाले, दबावाखाली जर केंद्र सरकार 24 तासात निर्णय घेऊ शकते तर इतर ठिकाणी अडकलेल्या खलाशाना आणण्यासाठी एका आठवड्यात निर्णय घेण्यास हे सरकार सक्षम आहे. सरकारने चार्टर विमानासाठी भारतीय विमानतळ खुले कारावेत एवढेच नव्हे तर विदेशात भूमीवर अडकलेल्या भरतीयांनाही भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

दरम्यान, आपल्या पतीला गोव्यात आणावे यासाठी उपोषणाला बसलेल्या जिना परेरा हिने खलाशाना भारतीय भूमीवर उतरता यावे यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केलेल्या प्रयत्नांना तोड नाही असे म्हणत त्यांचे धन्यवाद मानले.

चर्चिल म्हणतात मीच केले प्रयत्न

अडकलेल्या खलाशाना देशात येण्याचे मार्ग खुले झाल्यानंतर कित्येकजण त्याचे श्रेय घ्यायला पुढे आले असले तरी यासाठी सर्वप्रथम आपणच प्रयत्न केले . यासंबंधी आपण 29 मार्चला प्रधानमंत्र्यांना मेल पाठविला होता. वास्तविक त्यावेळीच या खलाशांचा देशात येण्याचा मार्ग खुला झाला होता पण निझमुद्दीन येथील मरकाजचे प्रकरण तेव्हाच उदभवल्याने तो निर्णय बारगळला गेला. या खलाशांचा देशात येण्याचा मार्ग मंगळवार बुधवारपर्यंत मोकळा होणार असे मी सांगितले होते पण मंगळवारी झालेल्या एका चर्चेत आमदार रोहन  खवटे व विजय सरदेसाई यांनी आपल्यावर नको नको ते आरोप केले पण मी जे काय सांगितले होते तेच आता खरे झाले असे चर्चिल म्हणाले.

तीन जहाजे भारताच्या वाटेवर

कार्निवल फेसिनेशन, कार्निवल लिबर्टी व एकटसी ही तीन जहाजे भारतात येण्यासाठी उद्या गुरुवारी सुटणार असून पहिली दोन जहाजे मियामीहून तर तिसरे जहाज जॅक्सनविले येथून सुटणार आहे. बार्बाडोस, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यामार्गे ती भारतात येणार आहेत. 27 किंवा 28 मेला ती मुंबईत पोहोचणार आहेत

Web Title: coronavirus: Preparations underway to bring 181 Gomantak sailors to Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.