Coronavirus: गोमेकॉ सुपर स्पेशालिटी, मडगांव जिल्हा इस्पितळाला हाऊसकिपिंग कामगार पुरवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 02:47 PM2020-10-22T14:47:49+5:302020-10-22T14:48:00+5:30

नारायण नावती : मनुष्यबळ विकास महामंडळाचा प्रस्ताव

Coronavirus: To provide housekeeping workers to Gomeco Super Specialty, Madgaon District Hospital | Coronavirus: गोमेकॉ सुपर स्पेशालिटी, मडगांव जिल्हा इस्पितळाला हाऊसकिपिंग कामगार पुरवू

Coronavirus: गोमेकॉ सुपर स्पेशालिटी, मडगांव जिल्हा इस्पितळाला हाऊसकिपिंग कामगार पुरवू

Next

किशोर कुबल 

पणजी :  सरकारला वेगवेगळ्या खात्यांमध्ये सफाई कामगार तसेच हाउसकीपिंगसाठी लागणारे अन्य प्रकारचे कामगार, सुरक्षा रक्षक आदी मनुष्यबळ पुरवणाऱ्या मनुष्यबळ विकास महामंडळाने आगामी काळात अनेक उपक्रम राबविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कोविड काळात या ईएसआय इस्पितळ तसेच अन्य ठिकाणी काम करणाऱ्या हाउसकीपिंग कामगारांनी कर्तव्यनिष्ठेने काम केले. त्याची वाहवा सर्वत्र होत आहे. या अनुषंगाने महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक नारायण नावती यांच्याशी केलेला हा वार्तालाप....

प्रश्न : कोविड काळात महामंडळाच्या हाउसकीपिंग कामगारांनी कशा प्रकारे सेवा दिली? या काळात महामंडळाने कोणती पावले उचलली?

उत्तर : मडगांवचे ईएसआय इस्पितळ, कोविड इस्पितळ तसेच वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कोविड निगा केंद्रांमध्ये साफसफाई  तसेच हाउसकीपिंगसाठी ९१ कामगारांना नियुक्त केले. या सर्वांनी आतापर्यंत अविरत सेवा दिलेली आहे. काही कामगारांना काम करताना कोविडची बाधाही झाली व त्यांना इस्पितळात उपचारार्थ दाखल व्हावे लागले. जीवाची बाजी लावून या कामगारांनी काम केले, त्यांचा आम्ही यथोचित गौरवही केला आहे. आमच्याकडे आज ५६८ हाऊसकिपिंग कामगार आणि २३०० सुरक्षा रक्षक आहेत. कोविडच्या काळात ड्युटीसाठी म्हणून हाउसकीपिंगसाठी अर्ज मागविले. २०४ जणांची निवड झाली. परंतु नंतर काही जणांनी अंग गाळले आणि ३१ जणच सेवेत रुजू झाले. हे सर्व जण इमाने इतबारे सेवा बजावत आहेत.

प्रश्न : महामंडळातर्फे कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती केलेले कामगार कोणकोणत्या खात्यांमध्ये आहेत आणि ते कसे काम करतात? 

उत्तर : सचिवालय, वन खाते, वाणिज्य खाते तसेच सरकारच्या अनेक खात्यांमध्ये इतकेच नव्हे तर गोमेकॉ, सरकारी इस्पितळे व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही आमचे कामगार आहेत आणि सर्वजण मेहनतीने काम करीत आहेत ड्युटीवर येताना वेळेचे पालन, शिस्त व कामसूपणा या गोष्टींना आम्ही प्राधान्य देतो. हाऊसकीपिंग कामगार असो, किंवा सुरक्षारक्षक कोणीही कामचुकारपणा करीत नाही. गोमेकॉत येऊ घातलेल्या मल्टीस्पेशालिटी विभागासाठी २५० ते ३०० सफाई कामगार तसेच तेवढ्याच संख्येने सुरक्षारक्षकही लागतील. मडगांवच्या जिल्हा इस्पितळालाही तेवढ्याच संख्येने कामगार लागतील. हे मनुष्यबळ पुरवण्याची तयारी महामंडळाने दर्शविली असून तसा प्रस्तावही सरकारला दिलेला आहे. सुरक्षा रक्षकांना आम्ही सेवेत घेताना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देतो.

प्रश्न : महामंडळाच्या आगामी योजना काय आहेत?

उत्तर : सरकारी कार्यालयांना तसेच अन्य सरकारी आस्थापनांमध्ये चालक, प्लंबर, इलेक्ट्रिशियन आदी तांत्रिकी सेवा देणारे कामगार उपलब्ध करण्याच्यादृष्टीने महामंडळाने विचार चालवला आहे. त्यासाठी योजनाही तयार आहे. हाउसकीपिंगसाठी सुरक्षा रक्षक किंवा कार्यालयीन प्रशासकीय कामकाजात ड्युटी बजावू शकतील अशा पद्धतीने प्रशिक्षण देऊन हे मनुष्यबळ उभे केले जाईल. एखाद्या खात्यात कारकून किंवा अन्य कर्मचारी दीर्घ रजेवर गेल्यास त्या जागी या कामगारांची नियुक्ती करता येईल, अशी ही व्यवस्था असेल. महामंडळातर्फे केली जाणारी नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीवर असली तरी कामगारांना भविष्य निर्वाह निधी, ईएसआय आदी गोष्टींचा लाभ दिला जातो. सेवेत पाच वर्षे पूर्ण केलेल्यांना ग्रॅच्युईटीही दिली जाते. त्यावेळी प्रशिक्षण काळात भत्ता दिला जातो.

प्रश्न : महामंडळाचे बजेट काय आणि एवढा डोलारा कसा काय सांभाळला जातो?

उत्तर : हाउसकीपिंगचे कामगार आणि सुरक्षारक्षक मिळून ३ हजार कामगारांचा वेतनाचा भार दर महिना पाच ते साडेपाच कोटी रुपये एवढा आहे. महामंडळाचे वार्षिक बजेट सुमारे ७२ कोटी रुपयांचे आहे. दरमहा ८० ते ९० लाख रुपये जीएसटी आम्ही भरतो. पगाराच्या बाबतीत अनेकदा अडचणी येतात त्या अशा की, ज्या खात्यांमध्ये या कामगारांची आम्ही नियुक्ती करतो त्या खात्यांकडून वेतनाची बिले मिळण्यास विलंब लागतो. काहीवेळा सहा ते आठ महिन्यांनी स्मरणपत्रे पाठवावी लागतात. कागदोपत्री सोपस्कारांमध्ये वेळ जात असल्याने या कामगारांना पगार संबंधित खात्यांनीच द्यावा, अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांनी महामंडळाला चांगल्या उपक्रमांसाठी मुक्त हस्त दिलेला आहे. त्या अनुषंगाने पुढील दोन वर्षात महामंडळ नफ्यात आणण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.

प्रश्न :  कामगारांच्या बाबतीत काही तक्रारी वगैरे येतात का किंवा गैरहजेरीचे प्रमाण काय आहे?

उत्तर : तक्रारींचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. कारण ड्युटीची वेळ पाळणे तसेच शिस्तीबाबत आम्ही कडक धोरण अवलंबिले आहे. सफाई कामगारांना सकाळी ८ ची ड्युटी असली तर पंधरा मिनिटे आधीच हजर राहण्यास बजावले आहे. कार्यालय सुरू होण्याआधी साफसफाई व्हायला हवी. सुरक्षा रक्षकांना ही तसेच निर्देश दिलेले आहेत. यांनीही वेळेवर ड्युटीला आले पाहिजे. कामगारांचे गैरहजेरीचे प्रमाण केवळ एक टक्का आहे. कामचुकारपणा मुळीच नसतो. आगामी काळात कनिष्ठ लिपिक, अव्वल कारकून, स्टेनो तसेच तांत्रिकी सेवा देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देऊन मनुष्यबळ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. सांगे, केपें, काणकोण, वाळपई, पेडणे आदी ग्रामीण भागांतील आणि खास करून भूमिपूत्रांना महामंडळामार्फत नोकऱ्या मिळाव्यात यासाठी प्राधान्य आहे. १५ वर्षे गोव्यात निवासाचा दाखला सक्तीचा आहे. खाजगी क्षेत्रात आम्ही पाहतो की, सुरक्षा रक्षक हे बिहार, उत्तर प्रदेश तसेच ईशान्येतील असतात. त्यांची पार्श्वभूमी कुणालाही माहिती नसते. आम्ही गोव्यातील भूमिपुत्रांना प्राधान्य देतो.

Web Title: Coronavirus: To provide housekeeping workers to Gomeco Super Specialty, Madgaon District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.