Coronavirus: राजधानी एक्सप्रेस ठरतेय गोव्यासाठी कोरोना एक्सप्रेस; ११ कोरोनाग्रस्त प्रवासी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 11:10 AM2020-05-24T11:10:25+5:302020-05-24T11:10:42+5:30
राजधानी एक्स्प्रेसला गोव्यात थांब्याला गोवेकरांचा विरोध होता. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस पक्षासह इतर सर्व पक्षांनी या ट्रेनला गोव्यात थांबा नको अशी मागणी करून सरकारवर हल्ला चढविला होता.
पणजीः दिल्लीहून सुटणारी राजधानी एक्स्प्रेसने आतापर्यंत आलेले 30 हून अधिक रुग्ण हे कोरोना संसर्गित ठरले आहेत. शनिवारी रात्री एकाचवेळी 11 संसर्गीत रुगण या ट्रेनमधून मडगावला उतरले आहेत. सर्वांना मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
नवीन रुग्णात 7 महिला तर 4 पुरूष आहेत. एका 5 वर्षीय मुलाचाही त्यात समावेश आहे. ट्रुनेट चाचणीत पॉझिटीव्ह आढळल्यामुळे त्यांना कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गोमेकॉत पीसीआर चाचणीसाठीही त्यांच्या लाळेचे नमुने पाठवून संसर्गाची खात्रीही करण्यात आली आहे.
राजधानी एक्स्प्रेसला गोव्यात थांब्याला गोवेकरांचा विरोध होता. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस पक्षासह इतर सर्व पक्षांनी या ट्रेनला गोव्यात थांबा नको अशी मागणी करून सरकारवर हल्ला चढविला होता. याच ट्रेनने आलेल्या संसर्गितांमुळे ग्रीन झोन असलेल्या गोव्यात झपाट्याने संसर्गित रुग्णांची संख्या वाढून 48 पोहोचली होती. 9 जण बरे होवून डिस्चार्ज घेऊन गेल्यामुळे इस्पितळात दाखल असलेल्या संसर्गितांची संख्या 39 पर्यंत खाली आली होती. आता पुन्हा ती 50 झाली आहे. रस्ता मार्गानेही संसर्गीत येत आहेत, परंतु त्यांची संख्या फार कमी असते. बहुतेक सर्व नवीन संसर्गीत हे कोणतीही लक्षणे न दाखविणारे होते.