गोव्यात हॉटेल्स, गेस्ट हाऊसना शिथिलता; मात्र पर्यटकांसाठी शिष्टाचार प्रक्रिया नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 08:53 PM2020-06-08T20:53:10+5:302020-06-08T20:53:16+5:30

सर्व प्रकारची तारांकित हॉटेल्स बंदच; व्यावसायिकांना भविष्याची चिंता 

coronavirus relaxation given to Hotels and guest houses in Goa | गोव्यात हॉटेल्स, गेस्ट हाऊसना शिथिलता; मात्र पर्यटकांसाठी शिष्टाचार प्रक्रिया नाही 

गोव्यात हॉटेल्स, गेस्ट हाऊसना शिथिलता; मात्र पर्यटकांसाठी शिष्टाचार प्रक्रिया नाही 

Next

पणजी : गोव्यात पर्यटकांसाठी अजून सरकारची शिष्टाचार प्रक्रिया निश्चित झालेली नसल्याने वास्तव्यासाठीची हॉटेल्स, गेस्ट हाऊसही उघडू शकलेली नाहीत. पर्यटक नाहीत त्यामुळे हॉटेले उघडून ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी स्थिती होऊ नये याकरिता व्यावसायिक हॉटेल उघडण्याच्या फंदात पडलेले नाहीत. हॉटेल व्यावसायिकांचे हे वर्ष वाया गेल्यातच जमा आहे. सप्टेंबरनंतर पाहू, अशी भूमिका काही व्यावसायिकांनी घेतली आहे. 

राज्यात पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या ‘टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा’ या संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की, ‘सरकारने हॉटेलमालकांना फॉर्म भरुन देण्यास सांगितले आहे. किती कर्मचारी असतील वगैरे माहिती मागितली आहे. मुख्य म्हणजे जे पर्यटक गोव्यात येतील त्यांच्यासाठी शिष्टाचार प्रक्रिया (एसओपी) निश्चित होणे आवश्यक आहे. पुढील सात ते आठ दिवसात हे काम होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.’

संपूर्ण हॉटेल क्वारंटाइन का करावे? 
शहा म्हणाले की, ‘उद्या एखाद्या पर्यटकाला ‘कोरोना’ची लागण झाली तर संपूर्ण हॉटेल क्वारंटाइन केले जाऊ नये. एक खोली क्वारंटाइन असावी. नपेक्षा हॉटेल उघडले आणि अशी समस्या उद्भवली तर सर्व मुसळ केरात, अशी स्थिती होईल. सरकारने काही सोपस्कार सुटसुटीत करायला हवेत, हेही तेवढेच खरे’

हे वर्ष वाया गेलेच : हॉटेलमालक 
अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष तथा शहरातील ‘मनोशांती’ हॉटेलचे मालक गौरीश धोंड म्हणाले की, ‘हॉटेल्स उघडली तरी पर्यटक नसल्याने सर्व खोल्या रिकाम्याच राहतील. हॉटेल उघडल्यानंतर आम्हाला रिसेप्शनीस्ट, वेटर, सुरक्षा रक्षक, साफसफाईसाठी कामगार ठेवावे लागतील. उत्पन्न काही नाही आणि उलट कामगारांवर खर्च अशी स्थिती होईल. 

धोंड म्हणाले की, ‘नाकापेक्षा मोती जड होऊ नये. हॉटेल उघडले तर ५ लाख रुपये खर्च आणि बंद ठेवले तर १ लाख रुपये खर्च अशी स्थिती असल्याने माझ्यासारखे व्यावसायिक हॉटेल उघडण्याच्या फंदात पडलेले नाहीत.’
 

Web Title: coronavirus relaxation given to Hotels and guest houses in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.