Coronavirus : 'कोरोना'बाबत खबरदारी! गोव्याच्या सीमेवरून पर्यटकांची परत पाठवणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 08:46 PM2020-03-20T20:46:07+5:302020-03-20T20:46:33+5:30
Coronavirus : पंतप्रधानांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत शुक्रवारी सायंकाळी व्हीडीओ कॉन्सफरन्सिंग पार पडली.
पणजी : राज्याच्या सीमेवरून देशी पर्यटकांची परत पाठवणी करण्याचे काम पोलीस यंत्रणेने सुरू केले आहे. कोरोना विषाणूपासून गोव्याला धोका पोहचू नये म्हणून सध्या पर्यटकांना गोव्यात येण्यापासून रोखणे गरजेचे ठरले आहे. सीमा सील केलेल्या नाहीत, पण गोवा सरकारची यंत्रणा सध्या महाराष्ट्र व कर्नाटकशी बोलणी करत आहे.
पंतप्रधानांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत शुक्रवारी सायंकाळी व्हीडीओ कॉन्सफरन्सिंग पार पडली. कोरोना विषाणूबाबत अधिक सतर्क होण्याचे गोवा सरकारनेही ठरवले. पुणे व अन्य भागांतून जे पर्यटक सध्या राज्याच्या सीमांवर पोहोचतात, त्यांची परतपाठवणी केली जात आहे. गोव्यात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, पत्रकारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारले असता, सावंत म्हणाले की राज्याच्या सीमा आम्ही सील केलेल्या नाहीत. काही जीवनावश्यक वस्तूंची आयात गोव्यात परराज्यांतून होत आहे. तथापि, गोवा सरकारची यंत्रणा सध्या महाराष्ट्र व कर्नाटकच्या जिल्हाधिका-यांच्या संपर्कात आहे. काय उपाय काढावा याविषयी चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, की पर्यटकांनी गोव्यात अकारण फिरू नये. पर्यटकांनी गोव्यात फिरणो हे सध्याच्या स्थितीत कुणाच्याच हिताचे नाही. प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी. गोव्यातील लोकांनी दुकानांवर सामान खरेदीसाठी गर्दी करण्याची गरज नाही. सहा महिन्यांचे सामान एकदाच साठवून ठेवण्याची गरज नाही हे लोकांनी लक्षात घ्यावे. जनता कफ्यरू रविवारी असून त्यावेळी लोकांनी घराबाहेर पडणो टाळावे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत कुणी घराबाहेर पडू नये अशी विनंती आहे.