Coronavirus: कोविडमुळे निधन झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये तर अनाथांना दरमहा मानधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 02:30 PM2021-05-30T14:30:29+5:302021-05-30T14:31:18+5:30
कोविडने आई-वडिलांचे निधन होऊन अनाथ बनलेल्या मुलांसाठी 'मुख्यमंत्री अनाथ आधार योजना' सरकार सुरू करणार
पणजी : आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या एखाद्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे कोविडने निधन झाले असल्यास त्या कुटुंबाला भरपाई म्हणून २ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. लवकरच याबाबतची अधिसूचना येईल. गोवा आज घटक राज्यातील साजरा करीत असून ३५ व्या घटकराज्यदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील जनतेला वर्च्युअल पद्धतीने संबोधले.
मुख्यमंत्री म्हणाले की, कोविडने घरातील कमावत्या व्यक्तींचाही बळी घेतला आहे. अशी काही कुटुंबे असतील की, जी आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील आहेत आणि त्यांच्या घरातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाले असेल. अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
'मुख्यमंत्री अनाथ आधार योजना'
कोविडने आई-वडिलांचे निधन होऊन अनाथ बनलेल्या मुलांसाठी 'मुख्यमंत्री अनाथ आधार योजना' सरकार सुरू करणार असून अनाथ मुलांना दरमहा मानधन दिले जाईल. तसेच अशी जी अनाथ मुले इयत्ता दहावी किंवा त्यापेक्षा वरील वर्गात शिकत आहेत त्यांना मोफत लॅपटॉप दिला जाईल. बालसंगोपन केंद्रांसाठी आतापर्यंत १८ वर्षे वयोगटापर्यंतच आर्थिक सहाय्य दिले जात होते ते आता २१ वर्षे वयोगटातपर्यंत सांभाळ करणाऱ्या संस्थांना दिले जाईल.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'कोविड महामारीतून जाताना अनेक आव्हानांचा सामना सरकारला करावा लागत आहे. सरकारने महामारीबाबत सुरुवातीपासूनच दक्षता घेतलेली आहे. खाजगी इस्पितळांकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे. आज गोव्यात कोविड पॉझिटिव्हिटीचा दर कमी होत चालला आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. गोवा या महामारीतून सावरणार हे निश्चित असून 'कोरोनामुक्त गोवा' हेच आमचे प्राधान्य आहे.'
घटक राज्यदिनानिमित्त राहुल गांधी यांच्या गोवेकरांना शुभेच्छा
३५ व्या घटक राज्यदिनानिमित्त काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी गोवेकरांना शुभेच्छा दिले आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात राहुलजी म्हणतात की, 'गोव्याची सुंदर संस्कृती व भाषा देशाची वैविध्यता अधिक समृद्ध बनविते.'