Coronavirus : गोव्यामध्ये कोरोनामुळे शिमगोत्सव टाळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 06:45 AM2020-03-18T06:45:36+5:302020-03-18T06:47:07+5:30
शिमगोत्सवाची मोठी परंपरा गोव्याला आहे. राजधानी पणजीत शिमगोत्सव मिरवणूक पार पडली पण मुरगाव, काणकोण अशा काही तालुक्यांतील लोकांनी शिमगोत्सव नको अशी भूमिका घेतली.
पणजी : कोरोना विषाणूचा एकही रुग्ण गोव्यात सापडलेला नसला, तरी अनेक संशयितांवर अधूनमधून उपचार केले जात असल्याने गोव्यात कोरोनाची धास्ती वाढली आहे. परिणामी गोव्यात प्रथमच काही शहरांतील यंदा लोकांनी व संबंधित समित्यांनी शिमगोत्सव बंद केले आहेत.
शिमगोत्सवाची मोठी परंपरा गोव्याला आहे. राजधानी पणजीत शिमगोत्सव मिरवणूक पार पडली पण मुरगाव, काणकोण अशा काही तालुक्यांतील लोकांनी शिमगोत्सव नको अशी भूमिका घेतली. नेटिझन्सनी सोशल मीडियावरून याबाबत काणकोण व मुरगावच्या लोकांचे कौतुक केले आहे.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या मते, अन्य शहरांतीलही शिमगोत्सव यावर्षी बंद व्हायला हवेत. कोरोनाचा संसर्ग कुणाला होऊ नये म्हणून प्रत्येक गोमंतकीयांनी काळजी घ्यायला हवी.
पर्यटकही शिमगोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये भाग घेत असतात. यामुळे कुणीच धोका पत्करू नये. शिमगोत्सव दरवर्षी येत असतो. दरवर्षी शिमगोत्सव साजरा करण्याची संधी मिळत असते. यंदा शिमगोत्सव मिरवणूक बंद झाली म्हणून काही बिघडणार नाही, असे मंत्री राणे म्हणाले.
लोकांनीच ठरवावे
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मात्र थोडी वेगळी भूमिका घेतली आहे. शिमगोत्सव बंद करावा, असा आदेश सरकार देणार नाही. पण संबंधित आयोजन समित्यांनी त्या विषयी निर्णय घ्यावा. शिमगोत्सवच नव्हे, तर अन्य कोणतेच मोठे सोहळे तूर्त आयोजित न करणे योग्य ठरेल. मोठ्या सभा व बैठकाही आयोजित न करणे योग्य ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधकांची टीका
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर विरोधकांनी टीका चालविली आहे. गोव्यात सध्या जिल्हा पंचायत निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांनिमित्ताने मुख्यमंत्री सावंत आणि त्यांच्या भाजपकडून मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेतल्या जात आहेत. वातानुकूलित यंत्रणा असलेल्या सभागृहांतही मोठ्या सभा घेतल्या जात असून त्याला शेकडो लोक उपस्थित राहत आहेत. मग मुख्यमंत्री कोरोनाच्या धास्तीपोटी सभा घेऊ नका, असा सल्ला विरोधकांना कसा काय देऊ शकतात, असा प्रश्न गोवा फॉरवर्डसह अन्य काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.