CoronaVirus : गोवा-महाराष्ट्र सीमेवर कडक ‘स्क्रीनिंग’, सरकारकडून कडक उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 02:50 PM2021-06-23T14:50:07+5:302021-06-23T14:50:48+5:30
CoronaVirus: सिंधुदुर्गात कोविड ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळल्याने या उपाययोजना आता अधिक कडक करण्यात आल्या आहेत.
पणजी : सिंधुदुर्ग, रत्नागिरीत कोविड डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने गोवा सरकारने कडक पावले उचलली असून गोवा-महाराष्ट्र हद्दींवर पत्रादेवी, दोडामार्ग, न्हयबाग-सातार्डा व आरोंदा अशा चार चेक नाक्यांवर महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश करणाऱ्यांचे ‘स्क्रीनिंग’ सुरु केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज नोकरी, धंद्यानिमित्त गोव्यात येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. गोमेकॉमध्ये उपचारांसाठीही सिंधुदुर्गातून लोक येतात. पत्रादेवी, दोडामार्ग, न्हयबाग-सातार्डा व आरोंदा अशा चार हद्दींवरुन महाराष्ट्रातून लोक गोव्यात प्रवेश करीत असतात. सिंधुदुर्गात कोविड ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळल्याने या उपाययोजना आता अधिक कडक करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, गोव्यात अद्याप डेल्टा प्लसचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे अन्य राज्यातून येणाऱ्यांकडून राज्यात हा संसर्ग होऊ नये, यासाठी गोवा सरकारने हे पाऊल उचलले आहे. ते म्हणाले की, ‘कोविड डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणे गोव्यात आहेत. २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत परंतु डेल्टा प्लसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. सरकारने या संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतलेली आहे.