CoronaVirus : अद्याप हजारो ब्रिटिश पर्यटक गोव्यातच, चार्टर पर्यटक परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 02:47 PM2020-04-03T14:47:42+5:302020-04-03T14:48:04+5:30
coronavirus : गोव्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश पर्यटक येत असतात एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत येथे त्यांचे वात्सव्य असते.
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: गोव्यात अडकलेल्या हजारो विदेशी पर्यटकांना जरी त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले असले तरी किमान हजारोहून अधिक ब्रिटिश पर्यटक अजूनही येथे अडकून पडले आहेत. त्यातच काही जण येथे हॉटेलात न राहता लोकांची घरे भाड्याने घेऊन राहिले आहेत त्यांचे तर विशेष हाल होत आहेत.
गोव्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश पर्यटक येत असतात एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत येथे त्यांचे वात्सव्य असते. यातील बरेच पर्यटक हॉटेलात न उतरता लोकांची समुद्र किनाऱ्यावर घरे भाड्याने घेऊन राहतात. अशा प्रकारे सद्या गोव्यात अजूनही बरेच ब्रिटीश पर्यटक असून त्यांची संख्या किमान एक हजाराच्या घरात असेल अशी माहिती करमणे येथील हॉटेल व्यावसायिक सेराफिन कॉता यांनी दिली.
कॉता यांच्याच हॉटेलात सध्या सात ब्रिटीश पर्यटक असून जोपर्यंत विमानसेवा सुरळीत होत नाही तोपर्यंत ते येथेच अडकून पडणार आहेत.
एरव्ही गोव्यात येणारे बहुतेक ब्रिटीश थॉमस कूकतर्फे गोव्यात यायचे मात्र यंदा ही कंपनी बंद पडल्याने हे लोक एअर एमिरट्स, ओमान एअर आणि एअर इंडियाच्या नियमित विमानांनी गोव्यात आले. मात्र आता नियमित विमानसेवा बंद पडल्याने त्यांचे परतीचे मार्ग तूर्तास बंद झाले आहेत. कॉता म्हणाले, जे पर्यटक चार्टर विमानांनी गोव्यात आले होते त्या चार्टर कंपन्यांनी त्यांना परत नेले पण नियमित विमानांनी आलेले पर्यटक अडकले. सध्या या पर्यटकांकडचे पैसेही संपले असून काही जण हॉटेल मालकांच्या कृपेवर अवलंबून आहेत.
जे पर्यटक हॉटेलात आहेत त्यांना हॉटेल मालकांच्या कृपेने का होईना पण जेवण व्यवस्थित मिळते पण भाड्याची घरे घेऊन राहिले आहेत त्यांच्यासमोर जेवणाचे सामान कुठून आणायचे हा प्रश्न उभा राहिला आहे. आता घरमालकानाच वस्तू मिळणे मुश्किल झाले आहे त्यामुळे या विदेशी पाहुण्याकडे कोण पाहणार अशी परिस्थिती झाली असून त्यामुळेही त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
टॅक्सी पास मिळण्यास कटकट
संचारबंदीमुळे एकबाजूने पर्यटक अडकून पडले आहेत आणि दुसऱ्या बाजूने त्यांना विमानतळावर घेऊन जायला टॅक्सी चालकही राजी होत नाहीत. याचे कारण म्हणजे टॅक्सी चालकांना वाहन चालविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून पास घ्यावे लागतात आणि ते मिळविण्यासाठी खूप कटकटी सहन कराव्या लागतात. ही पास पध्दत सुटसुटीत करावी आणि विमानतळावर भाडी मारायला पास स्थानिक पोलीस स्थानकावरून मिळावेत अशी मागणी होत आहे.