Coronavirus: पर्यटक माघारी परतले, हॉटेलमधील मनुष्यबळात पुन्हा कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 07:50 PM2021-04-24T19:50:35+5:302021-04-24T19:51:35+5:30
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात मोठ्या संख्येने देशी पर्यटक दिसायचे. पणजी, म्हापसा, मडगाव या शहरांसह उत्तर व दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीत हे पर्यटक फिरायचे.
पणजी : राज्यात कोविड रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर पर्यटकांनी गोव्याची धास्ती घेतली. पर्यटक माघारी परतू लागले असून त्यामुळे हॉटेल व्यवसाय क्षेत्रातील मनुष्यबळात कपात केली जाऊ लागली आहे.
अनेक गोमंतकीय युवा- युवती हॉटेल व्यवसाय क्षेत्रात काम करतात. तसेच महाराष्ट्र- कर्नाटक वगैरे भागातील तरुणही हॉटेलमध्ये काम करतात. शेक म्हणजे पर्यटन गाळ्यांतही ते काम करतात. काही हॉटेल व्यवसायिकांनी या मनुष्यबळात कपात करणे सुरू केले आहे. कळंगुट, कांदोळी, वागातोर, बागा या उत्तर गोव्याच्या किनारपट्टीसह दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीतही पर्यटकांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. हॉटेलमध्ये पूर्वी अनेक खोल्या आरक्षित होत्या. मात्र हॉटेल व्यवसायिक असलेले मंत्री मायकल लोबो यांच्या मते आता पर्यटक जास्त राहिलेलेच नाहीत.
दरम्यान, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात मोठ्या संख्येने देशी पर्यटक दिसायचे. पणजी, म्हापसा, मडगाव या शहरांसह उत्तर व दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीत हे पर्यटक फिरायचे. मध्यंतरी ते मास्क न घालता फिरतात म्हणून पोलिसांनी त्यांना दंड देणे सुरू केले होते. आता बहुतांश पर्यटक माघारी गेले आहेत. विमान व रस्तामार्गे गोव्यात येणाऱ्यांची संख्या खूपच कमी झाल्याचे दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री सावंत यांनीही सांगितले गोव्यात रोज एक ते दीड हजार नवे कोविड रुग्ण आढळू लागले असून पंधरा ते वीस रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे. शनिवारी सतराजण दगावले.