coronavirus: पर्यटकांनी गोव्यात अधिक काळजी घ्यावी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 08:14 PM2021-03-17T20:14:04+5:302021-03-17T20:14:56+5:30
coronavirus in Goa : राज्यातील कोविडचा धोका पर्यटकांनी ओळखावा व सार्वजनिक ठिकाणी फिरताना अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिला आहे.
पणजी - राज्यातील कोविडचा धोका पर्यटकांनी ओळखावा व सार्वजनिक ठिकाणी फिरताना अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिला आहे. (Tourists should be more careful in Goa, appeals Chief Minister Pramod Sawant)
राज्यात जनता कर्फ्यूची सध्या गरज नाही. महाराष्ट्र व अन्यत्र कोविडग्रस्तांची संख्या वाढतेय यावर आमचे लक्ष आहे. आम्ही गोव्यात चाचण्यांचे प्रमाण वाढवणार आहोत. मात्र गोव्यात जे पर्यटक फिरतात, त्यांनी तोंडाला मास्क बांधणे, सोशल डिस्टनसींग पाळणे तसेच कोविडविषयक अन्य एसओपींचे पालन करावे. गोमंतकीयांनीही काळजी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
पंतप्रधानांकडून सर्वांना सतर्कतेची सूचना
दरम्यान, पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बुधवारी व्हीडीओ कोन्फरन्सद्वारे संवाद साधला. प्रसंगी मिनी कंटेनमेन्ट झोन देखील राज्यांनी करावेत असा सल्ला पंतप्रधानांनी दिला असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना सांगितले. गोव्यात मिनी कंटेनमेन्ट झोनची सध्या गरज नाही पण कोविडविषयीच्या धोक्याची कल्पना सर्वांनी लक्षात घ्यावी असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यासह अन्य राज्यांत लसीकरण कसे चाललेय हेही पंतप्रधानांनी जाणून घेतले.