Coronavirus: कोविडच्या संकटातही गोव्यात इफ्फीचे आयोजन होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 06:13 PM2020-06-20T18:13:31+5:302020-06-20T18:14:09+5:30
एरव्ही जुलै महिन्यात इफ्फीसाठी हॉटेल बुकिंग व अन्य प्रक्रिया सुरू होते पण यंदा ही प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे अजून दिसत नाहीत.
सदगुरू पाटील
पणजी : उर्वरित भारताप्रमाणोच गोव्यातही कोविडचे संकट अजून कायम आहे. गोव्यात तर जून महिन्यात पाचशे नवे रुग्ण आढळले. कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाहीत व त्यामुळे कोविडच्या संकट काळातही भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन गोव्यात होणार काय अशी प्रश्नार्थक चर्चा राज्यात सुरू झाली आहे.
गेल्या 2004 सालापासून गोव्यात दरवर्षी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतो व त्यात सिने कलावंतांसह देश- विदेशातील आठ- दहा हजार प्रतिनिधी सहभागी होतात. वार्षिक सरासरी तेरा कोटी रुपये इफ्फीसाठी खर्च केले जातात. येथील हॉटेल्स, स्थानिक कलाकार, टॅक्सी व्यवसायिक, रेस्टॉरंट्स यांना इफ्फीपासून लाभ होतो. मांडवी नदीतील कॅसिनो व्यवसायिकांनाही लाभ मिळतोच. शिवाय पर्यटन व्यवसाय क्षेत्रलाही इफ्फी लाभदायी ठरतो.
एरव्ही जुलै महिन्यात इफ्फीसाठी हॉटेल बुकिंग व अन्य प्रक्रिया सुरू होते पण यंदा ही प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे अजून दिसत नाहीत. जून महिन्यात जी पूर्वतयारी सुरू व्हायची चाहूल लागते, ती चाहून अजुनही लागत नाही. कोविड संकटामुळे आयनॉक्स मल्टीप्लेक्स यापूर्वीच बंद झाला. तिथे सध्या कुणी फिरकतही नाही. पूर्ण नवा मल्टीप्लेक्स आयनॉक्स स्वखर्चाने बांधणार आहे. त्यासाठी प्राथमिक काम नुकते कुठे सुरू झाले आहे. गेल्यावर्षी पन्नासावा इफ्फी पणजीत पार पडला. दि. 20 नोव्हेंबरपासून एरव्ही इफ्फीला आरंभ होत असतो. केवळ पाच महिन्यांचा कालावधी आता बाकी आहे. मार्चमध्ये सध्याची आयनॉक्स इमारत पाडली जाईल असे अगोदर जाहीर झाले होते पण अजून इमारत पाडली गेलेली नाही.
गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांना विचारले असता, ते म्हणाले की इफ्फीसाठी साधनसुविधा उभ्या करून देण्याचे काम मनोरंजन संस्था करते. आम्ही कधीही इफ्फीसाठी सज्ज राहू. आम्हाला त्याबाबत काही समस्या नाही. इफ्फीचे आयोजन कधी करायचे किंवा त्याविषयी कोणता निर्णय घ्यावा ते ठरविण्याचा अधिकार हा चित्रपट महोत्सव संचालनालयाचा (डीएफएफ) आहे. आयनॉक्स मल्टीप्लेक्स निश्चितच नोव्हेंबर्पयत उभा राहिल. भारतात तीनच ठिकाणी पहायला मिळतात अशा प्रकारचा अत्याधुनिक मल्टीप्लेक्स उभा राहिल व त्यासाठी गोवा सरकारला एकाही पैशाचा खर्च येणार नाही. उलट पूर्वीपेक्षा यापुढे खूप जास्त महसुल सरकारला मल्टीप्लेक्सद्वारे मिळेल. अगोदर दर महिन्याला आयनॉक्सकडून सरकारला वीस लाखांचा महसुल मिळायचा, यापुढे 54 लाखांचा मिळेल. चार स्क्रिन्स असतील. रेन वॉटर हाव्रेस्टींगची सुविधा व मलनिस्सारण प्रकल्पही असेल. आम्ही सगळ्य़ा सुविधा इफ्फीसाठी वेळेत तयार ठेवणार आहोत.